एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ट्रम्पसाठी चीनला दुखावून काय साध्य केले?, संजय राऊतांचा पंतप्रधानांना 'रोखठोक' सवाल
गलवान व्हॅलीत झालेल्या संघर्षात 20 भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर केंद्रसरकार विरोधी पक्षांसह अनेकांनी टीका केली. आता शिवसेनेनं देखील सामनाच्या माध्यमातून घणाघाती टीका केली आहे.
मुंबई : भारत-चीन दरम्यान सध्या संघर्ष सुरु आहे. गलवान व्हॅलीत झालेल्या संघर्षात 20 भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर केंद्रसरकार विरोधी पक्षांसह अनेकांनी टीका केली. आता शिवसेनेनं देखील सामनाच्या माध्यमातून घणाघाती टीका केली आहे. परराष्ट्र व संरक्षणविषयक चुकलेल्या धोरणाचे हे फलित असून, चीनच्या आक्रमणाने बाहुबली राजकारणाची हवा निघाली. चीनने आपले 20 सैनिक मारले. त्याचा बदला मोदी सरकार कसा घेणार, हाच खरा सवाल आहे, अशा शब्दात सामनाच्या रोखठोक सदरातून संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
राऊत यांनी म्हटलं आहे की, चीनने आपले 20 सैनिक मारले. त्याचा बदला मोदी सरकार कसा घेणार, हाच खरा सवाल आहे. की बदला घेण्यासाठी, सर्जिकल स्ट्राइक करून विजयी डंका पिटण्यासाठी पाकिस्तान हा राखीव ठेवला आहे? 20 जवानांच्या हत्येचा बदला मोदी सरकारने घेतला नाही तर ती आपली सगळ्यात मोठी मानहानी ठरेल. 1962 चे चीनबरोबरचे युद्ध नेहरूंच्या धोरणांमुळे हरलो हा डंका भाजपला आता पिटता येणार नाही. गलवान व्हॅलीत चीनचे सैन्य घुसले व आज गलवान व्हॅली चिनी सैनिकांच्या कब्जात आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने बुधवारी दुपारी अधिकृतपणे जाहीर केले की, ‘गलवान व्हॅली हा चीनचाच भूभाग आहे.’ यावर भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही.
पाकिस्तानचे सैन्य कारगिलपर्यंत पोहोचले हे समजताच पंतप्रधान वाजपेयींनी युद्धच पुकारले. लडाख, गलवान व्हॅली चीनच्या जबड्यात गेली व आपण सुटकेचा मार्ग शोधत आहोत. आता ट्रम्पही निवडणूक हरतील अशी स्थिती आहे. ट्रम्पसाठी चीनला दुखवून काय साध्य केले? ,असा सवाल सामनातून केला आहे.
मोदी सरकारने तटस्थतेचे धोरण सोडून अमेरिकेच्या जास्त कच्छपी लागण्याचे धोरण स्वीकारले व सीमेवरचा चीन जास्त आक्रमक झाला हे येथे लक्षात घेतले पाहिजे. भारताच्या सीमेवरील बहुतेक सर्व राष्ट्रे आज चीनची मांडलिक आहेत. पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका ही राष्ट्रे चीनच्या मदतीवर जिवंत आहेत व चीनच्या इशाऱ्यावर भारताला आव्हान देत आहेत. महासत्ता अमेरिकेशी मैत्री वगैरे ठीक, पण सीमा अशांत राहिल्या तर महासत्ता काय करणार? अमेरिकेसाठी निकटचा शेजारी असलेल्या चीनशी भांडण करणे ही परराष्ट्र व संरक्षणविषयक नीती असू शकत नाही. दुर्दैवाने आज तेच घडताना दिसत आहे, असं सामनात म्हटलं आहे.
'भारत सारख्या देशात अधूनमधून कसल्या ना कसल्या तरी लाटा येतच असतात. कोरोनाच्या लाटेचा जोर कायम असतानाच देशात चीनविरोधी संतापाची लाट उसळली आहे, पण काही संताप हे षंढ असतात. असे षंढ संताप चीनच्या बाबतीत अनेकदा निर्माण झाले आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिन पिंग दोन वर्षांपूर्वी अहमदाबादेत पंतप्रधान मोदींचे खास पाहुणे म्हणून आले होते. सर्व वाद मिटतील असे ते म्हणाले होते, पण तेव्हाही माझ्या मनात तेच विचार आले जे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांबाबत फिडेल कॅस्ट्रो यांच्या मनात आले होते. या लोकांवर विश्वास ठेवता येत नाही. चार दिवसांपूर्वी लडाखच्या हद्दीत जो रक्तरंजित संघर्ष झाला तो पाहिल्यावर चीनचा खरा चेहरा पुन्हा उघडा पडला' असं मत सामनातून व्यक्त केलं आहे.
'चीनशी आपले भांडण न संपणारे आहे; कारण या भांडणाचा सरळ संबंध आपण अमेरिकेशी ठेवलेल्या संबंधांशी आहे. पाकिस्तानशी युद्ध झालेच तर ते परिचित भूभागावरून होणार असल्यामुळे हिंदुस्थानी सैनिक तेथे मुळीच कमी पडणार नाहीत, पण चीनच्या बाबतीत तसे म्हणता येणार नाही. गलवान व्हॅलीत आपण खाली खोल कोसळलो आहोत. त्यातून बाहेर पडावे लागेल. पंतप्रधान मोदींबरोबर देश उभाच आहे, पण ते देशाचे ऐकणार आहेत काय? असा थेट सवाल सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊत यांनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
निवडणूक
राजकारण
Advertisement