Shiv Sena Meeting | भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्त्व करेल : उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाचे संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख आणि आमदारांच्या बैठकीत भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्त्व करेल, असा विश्वास व्यक्त केला.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाचे संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख आणि काही आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधताना भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्त्व करेल, असा विश्वासही व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर ही बैठक पार पडली.
राम मंदिरावरुन भाजपवर टीका उद्धव ठाकरे म्हणाले की, "रामाच्या नावाने काही लोक घरोघरी पैसे मागण्यासाठी जात आहेत. पण आपल्याला तसं करायचं नाही. बाबरी मशिद प्रकरणात शिवसेना रस्त्यावर उतरली होती. आता भाजप पैसे गोळा करण्यासाठी रस्त्यावर आले आहेत." "देखो ये काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो" असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे. तसंच तळागाळातला माणूस हा तुमच्यामार्फत माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी केली.
पाकिस्तानात भगवा फडकावल्यास आनंद होईल : उद्धव ठाकरे नेपाळ आणि श्रीलंकेत सत्ता स्थापन करणार असं म्हणतात. हिंमत असेल तर पाकिस्तान बांगलादेशमध्ये सत्ता स्थापन करुन दाखवा मग आम्ही तुमचं स्वागत करु, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी पाकिस्तानला दिलं. तसंच पाकिस्तानमध्ये भगवा फडकवा, आम्हाला आनंद होईल, असंही ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वातंत्र्यलढ्यात कुठेही नव्हती, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरएसएसवर निशाणा साधला.
भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्त्व करेल : उद्धव ठाकरे दुसऱ्या राज्यात शिवसेना मोठ्या प्रमाणात होती. पण त्यावेळी शिवसेनेने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याने आपले लोक भाजपमध्ये गेले, नाहीतर आज वेगळी परिस्थिती असती, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पण भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.