(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या देणाऱ्या 'फायर आजी' नेमक्या कोण?
Shiv Sena vs Navneet Rana : मातोश्री बंगल्याबाहेरच्या आंदोलनात 92 वर्षांच्या आजींचा सकाळपासून सहभाग, आजी आमची फायर आहे, शिवसैनिकांच्या घोषणा.
Shiv Sena vs Navneet Rana : राणा विरुद्ध सेना संघर्षाचा आजचा तिसरा दिवस. नवनीत राणांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठणाचा इशारा दिला आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक (Shivsainik) आक्रमक झाला. राणांच्या इशाऱ्यामुळे शिवसैनिक मुंबईतील (Mumbai) खार येथील राणांच्या घरासमोर जमले आणि राणांना घराखाली या असं आव्हानही दिलं. तर दुसरीकडे मातोश्री (Matoshree) निवासस्थानाबाहेरही शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. राणांविरोधात खारच्या घराबाहेर शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली, तर राणा दाम्पत्यांच्या इशाऱ्यानंतर मातोश्रीबाहेर कालपासूनच कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानाही शिवसैनिकांनी सुरक्षा कवच दिलं आहे. पण मातोश्रीबाहेर जमलेल्या बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिंकांपैकी चर्चेचा विषय ठरल्या त्या चंद्रभागा आजी.
सकाळपासूनच मातोश्री बंगल्याबाहेर 92 वर्षांच्या या आजी पहारा देत आहेत. यांचं नाव चंद्रभागा गणपत शिंदे. वयाबाबत विचारलं तर नक्की माहीत नाही, पण 92 वर्ष असावं असं आजी सांगतात. कुठून आलात विचारलं तर शिवडी विधानसभा मतदार संघ, शिवसेना शाखा क्रमांक 202 मधून आले असं उत्तर आजींनी दिलं. कशासाठी आलात असं विचारल्यावर मात्र क्षणाचाही विलंब न लावता आजींनी आक्रमक पवित्रा घेत बाळासाहेबांपासूनची मी शिवसैनिक आहे, साहेबांसाठी आम्ही झटणार, आमच्या वहिनींना, साहेबांना त्रास देतायत, आम्ही त्यांना इंगा दाखवणार, शिवसेनेसाठी रक्ताचं पाणी केलंय, हरणार नाही, तुम्ही येऊन दाखवाच, असा इशाराच दिला. तर आजीसोबत असलेल्या शिवसैनिकांनी आजी आमची फायर आहे, अशा घोषणा दिल्या.
सकाळपासूनच आजी गर्दीची, उन्हाची पर्वा न करता मातोश्रीचं सुरक्षा कवच बनल्यात. पण सर्वांनाच प्रश्न पडलाय. मातोश्रीसाठी लढणाऱ्या, राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या देणाऱ्या या आजी नेमक्या कोण?
आजींचं नाव चंद्रभागा गणपत शिंदे. मुंबईतील शिवडी येथील त्या रहिवासी. अजुनही शिवडी नाक्यावर भाजीचा व्यवसाय करतात. गणपतीत गणपतीपुळेचं साहित्यही विकतात. तर पोलिसदूत म्हणून विभागात काम करतात आणि पोलिसांनाही सामाजिक कामात मदत करतात. आजींना दोन मुलं आणि दोन नातवंड आहेत. तर आजींचे पती बीपीटीमध्ये कामाला होता. सध्या ते हयात नाहीत. त्यामुळे आजींना त्यांची पेन्शन मिळते. आजींना विचारलं की, तुम्ही केव्हापासून शिवसैनिक आहात, तर त्या बाळासाहेबांपासून शिवसैनिक असल्याचं सांगतात. तसं आजींचं शिवसेनेसोबतंच नातंही खास आणि तितकंच सलोख्याचं. बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकांपैकी एक चंद्रभागा आजी.
एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी आजींशी खास बातचित केली. त्यावेळी आजींनी आपण तरुणपणापासूनचं शिवसेनेशी जोडलो गेल्याचं आजी सांगतात. माजी आमदार वामनराव महाडिकांसोबत त्यांनी काम केलंय. काही दिवसांपूर्वी ज्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत आरोपांची तोफ डागली होती. त्यावेळीही आजी तिथे उपस्थित होत्या. पत्रकार परिषदेनंतर आजींनी संजय राऊतांची भेट घेऊन त्यांना पाठिंबाही दर्शवला होता. तर राणा दाम्पत्याच्या इशाऱ्यानंतर आज मातोश्रीवर राणा दाम्पत्य कसं येतं बघतेच म्हणत, भर दुपारच्या उन्हात बसून ठिय्या दिला.
आधीचं राजकारण असं नव्हतं, आता राजकारण खराब होत चाललंय, असंही आजींनी बोलताना सांगितलं. एवढंच नाहीतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भेटल्याच्या आठवणीही आजींनी सांगितल्या. ठाकरे कुटुंबासाठी आणि मातोश्रीसाठी सुरक्षा कवच म्हणून भर उन्हात बसलेल्या आजींची दखल मुख्यमंत्र्यांनीही घेतली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी फोन करुन आजींची विचारपूस केली. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांना मातोश्रीवर बोलवून आजी काळजी घ्या, उन्हात फिरू नका, असं सांगितलं.
दरम्यान, स्वतःला बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिक म्हणणाऱ्या या आजी आज सकाळपासूनच युवासैनिकांसोबत मातोश्रीबाहेर पाहारा देताना दिसून आल्या. युवासैनिकांसोबत मोतोश्रीबाहेरील रस्त्यावर बसून आज्जीबाईंनी भजनं आणि आरत्या गाण्यास सुरुवात केली. भर उन्हातही आजींचा निर्धार ठाम होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shivsena Pramukh Balasaheb Thackeray) यांचं निवासस्थान मातोश्री म्हणजे, शिवसैनिकांसाठी आजही मंदिरासारखंच, असं अनेक शिवसैनिक सांगतात. अशातच या 92 वर्षांच्या आजी अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हात बसून मातोश्रीचं सुरक्षाकवच म्हणून खंबीरपणे उभ्या असल्याचं दिसून आलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :