Shiv Sena : 'हृदयात राम अन् हाताला काम असं आमचं हिंदुत्व'; शिवसेनेचा आज वर्धापन दिन, टीझर जारी
Shiv Sena Vardhapan Din : शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे सेलिब्रेशन करण्यात येणार आहे. विधानपरिषद निवडणूक आणि वाढत्या कोरोना रुग्णांमुळे मुख्यमंत्री ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत.
Shiv Sena Vardhapan Din : शिवसेनेचा 56वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. मात्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईतील हॉटेल वेस्ट इनमध्ये मुक्कामी आहेत. याच ठिकाणी शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे सेलिब्रेशन करण्यात येणार आहे. विधानपरिषद निवडणूक आणि वाढत्या कोरोना रुग्णांमुळे मुख्यमंत्री ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. राज्यसभा निवडणुकीतील पराभव आणि उद्या होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय कानमंत्र देणार याकडं लक्ष लागलं आहे.
दरम्यान शिवसेनेकडून आजच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक टीझर जारी करण्यात आला आहे. या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या तिघांच्या भाषणाची एक एक वाक्य दिली आहेत. यात हिंदुत्व आणि भगव्याचं राजकारण यावर भाष्य करण्यात आलंय. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वेस्ट इन हॉटेलमध्ये शिवसेनेकडून वर्धापन दिनाचं सेलिब्रेशन करण्यात येणार आहे.
ट्वीट करत शिवसेना कार्यकर्त्यांना शुभेच्छा
पक्षनिष्ठा आणि आपुलकीने पक्षाला भक्कम करणाऱ्या तमाम निष्ठावंत शिवसैनिकांना ५६ व्या शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा, अशा शब्दात शिवसैनिकांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
५६ वर्षे जनसेवेची..
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) June 19, 2022
प्रखर हिंदुत्वाच्या तेजाने
तळपत्या शिवसेनेची...
पक्षनिष्ठा आणि आपुलकीने पक्षाला भक्कम करणाऱ्या तमाम निष्ठावंत शिवसैनिकांना ५६ व्या शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!#ShivsenaAT56 pic.twitter.com/tlhMFJkbby
यावर्षीही शिवसेनेचा वर्धापन दिन ऑनलाईन
यावर्षीही शिवसेनेचा वर्धापन दिन ऑनलाईन साजरा होणार आहे. सध्या विधानपरिषद निवडणुकीमुळे सर्व आमदार आणि महत्वाचे पदाधिकारी एकाच हॉटेलमध्ये आहेत. त्यात कोरोना डोकं वर काढत असल्यामुळे हा मेळावा ऑनलाईन होणार आहे. राज्यसभेनंतर होणाऱ्या विधान परिषद आणि महानगर पालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हा मेळावा महत्वाचा मानला जात आहे. मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कार्यकर्ते आणि जनतेला काय संबोधित करणार याकडे सर्वाचं लक्ष आहे.
विधान परिषद निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा चारही पक्षांनी आपआपल्या आमदारांची मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे. राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच सगळे पक्ष खबरदारी घेत आहेत. शिवसेनेचे आमदार हॉटेल वेस्ट इनमध्ये मुक्कामाला आहेत.