Uddhav Thackeray Sharad Pawar : उद्धव ठाकरे 'सिल्वर ओक'वर शरद पवारांच्या भेटीला; या मुद्यांवर चर्चा ?
Uddhav Thackeray Meet Sharad Pawar : सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यानंतर आज पवार आणि ठाकरे यांच्यात भेट होत असल्याचे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी 'सिल्वर ओक'वर दाखल झाले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत हेदेखील आहेत. या दोन नेत्यांमध्ये होत असलेल्या भेटीवर विविध चर्चांना उधाण आले आहे. सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यानंतर आज पवार आणि ठाकरे यांच्यात भेट होत असल्याचे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले.
महाविकास आघाडी आणि महायुतीने किती जागा जिंकल्या, यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर आगामी निवडणुकीवर महाविकास आघाडीकडून लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या स्थापनेबाबतही चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
भेटीचे कारण अदानी?
काही दिवसांपूर्वी शरद पवार म्हणाले होते अदानींबाबत उद्धव ठाकरेंची काही मतं आहे, त्याबाबत मी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे, बैठकीला ही पार्श्वभूमी देखील आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी अदानी यांच्यावर निशाणा साधला होता. धारावी पुनर्विकासाचे कंत्राट अदानी समूहाकडे गेले आहेत. त्यावरून उद्धव यांनी भाजप आणि अदानी यांच्यातील संबंधावर भाष्य केले होते.
जितेंद्र आव्हाड यांनी काय म्हटले?
शरद पवार यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड हे सिल्वर ओकवर उपस्थित होते. तर, ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत होते. जवळपास 45 मिनिटे ही बैठक सुरू होती. बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, आजची बैठक ही कौटुंबिक स्वरुपाची होती...यात राजकीय विषयावर फार चर्चा झाली नाही. राजकीय बैठक नसल्याने काँग्रेसच्या नेत्यांना आमंत्रण नव्हते, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.