भोंग्याच्या राजकारणामुळे हिंदुत्व बदनाम होतंय, संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut Press Conference : आम्हाला भोंग्यांबाबत कोणीही अक्कल शिकवू नये, असं म्हणत संजय राऊत यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
Shiv Sena MP Sanjay Raut Press Conference : भोंगा वादामुळे हिंदुत्व बदनाम होत असून भोंगावादामागे भाजपचाच हात असल्याचा आरोप शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, भोंग्यांबद्दल भाजपला (BJP) भूमिका घ्यायचीच असेल तर पंतप्रधान मोदींनी भोंग्यांबाबत राष्ट्रीय धोरण तयार करावं आणि ते राबवण्याची सुरुवात बिहारपासून तयार करावी, असं आव्हानही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिलं आहे. तसेच, आम्हाला भोंग्यांबाबत कोणीही अक्कल शिकवू नये, असं म्हणत संजय राऊत यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. मुस्लिमांसोबतचे प्रश्न बाळासाहेबांनी चर्चेतून सोडवेले, असंही त्यांनी म्हटलं आहे.
केंद्राने भोंग्यांसंदर्भात राष्ट्रीय धोरण आखण्याची गरज : संजय राऊत
शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, "आता जे काही हिंदुत्वाच्या नावावर राजकीय भोंगे वाजत आहेत, ढोंग सुरु आहे. हे ढोंग फार काळ चालणार नाही, यामुळे हिंदुत्व बदनाम होतंय. हिंदुत्वाबाबत लोकांच्या मनात शंका निर्माण होत आहेत. हे ज्याप्रकारे सुरु आहे ते पाहता केंद्राने भोंग्यांसंदर्भात राष्ट्रीय धोरण आखण्याची गरज आहे. आतापर्यंत गुजरातमधील लाऊडस्पीकर काढण्यात आलेले नाहीत. उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्येही जाऊन पाहा. ज्याप्रकारे गोवंश हत्यासंबंधी एक धोरण तयार केलं, पण काही राज्यांना तुम्ही सूट दिली. गोव्यासारख्या काही राज्यांनी तुमचं धोरण स्वीकारण्यास नकार दिला. मग काय झालं त्या राष्ट्रीय धोरणाचं? पण मी पक्षाच्या वतीने पंतप्रधानांना आवाहन करतो की, तुमच्या लोकांनी आणि त्यांच्या इशाऱ्यावर जो लाऊडस्पीकरचा वाद उभा केला आहे, त्यावर राष्ट्रीय धोरण करा आणि सर्वात आधी बिहारमध्ये नंतर दिल्ली, गुजरातमध्ये लागू करा. महाराष्ट्र तर कायद्याचं पालन करणारं राज्य आहे. हिंमत असेल तर धोरण करा आणि सक्तीने त्यांची अंमलबजावणी करा."
"नाना पटोले (Nana Patole), एकनाथ खडसे, माझ्यासहित सर्वांना समाजविघातक घटक असल्याचं खोटं सांगत फोन टॅप करण्यात आले होते हे समोर आलं आहे. गृहविभागाकडून फोन टॅपिंगची परवानगी घेताना रश्मी शुक्ला यांनी ड्रग्ज तस्कर, गँगस्टर असल्याचं सांगितलं. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार तयार होत असताना आमच्यावर नजर ठेवत नव्या सरकारसंबंधी माहिती घेतली जात होती. आमच्या अभिव्यक्तीवर घाला घालण्यात आला. एक पोलीस अधिकारी ज्यांच्याकडून तुम्ही निष्पक्ष काम करण्याची अपेक्षा ठेवता त्या एका राजकीय पक्ष, नेत्यासंबंधी आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी हे सर्व करत होती. आता रश्मी शुक्ला यांना केंद्र सरकार संरक्षण देत आहे. हे दुर्भाग्यपूर्ण आहे ", असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.