आज बाळासाहेब असते तर विरोधी पक्षांमधील कावकाव, चिवचिव थंड पडली असती : संजय राऊत
शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sajay Raut) यांनी आज बोलताना विरोधकांवर निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले की, आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray असते तर बऱ्याच या गोष्टी झाल्या नसत्या.
मुंबई : आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांची जयंती आहे. या निमित्ताने त्यांना सर्व स्तरांतून अभिवादन केलं जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sajay Raut) यांनी आज बोलताना विरोधकांवर निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले की, बाळासाहेब असते तर बऱ्याच या गोष्टी झाल्या नसत्या. विशेषतः जी विरोधी पक्षांमध्ये आज-काल कावकाव चिवचिव चालू आहे, जी तडफड सुरू आहेत ती बाळासाहेबांच्या अस्तित्वाने थंड पडली असती.
बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला राजकीय दिशा दिली
ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी बोलताना आणि सांगताना आजही आम्हाला वाटतं की ते आमच्या आसपास आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला राजकीय दिशा दिली. बाळासाहेब होते तोपर्यंत कोणाचीही पोपटपंची चालली नाही. बाळासाहेबांचा शब्द म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण होता. त्यांचे जीवन म्हणजे धगधगता अग्निकुंड होतं, असं ते म्हणाले.
भाजपच्या बेताल माकडचेष्टा पाहून बाळासाहेब काय म्हणाले असते? 'रोखठोक'मधून संजय राऊत म्हणतात...
दुसरे बाळासाहेब निर्माण होणार नाहीत
ते म्हणाले की, मराठी माणूस त्यांचा सदैव ऋणी राहील. आज या देशात आपण मराठी म्हणून जे अभिमानाने जगत आहोत ते बाळासाहेबांमुळेच. बाळासाहेब नसते तर मी नसतो. सामान्यातल्या सामान्य माणसाला शूरवीर करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. दुसरे बाळासाहेब निर्माण होणार नाहीत. बाळासाहेब सांगायचे कि एके काळी मी कुंचला हाती घेतला आणि फटकारे मारले की अनेक जण थरथर कापायचे. ज्यावेळी त्यांनी कुंचला खाली ठेवला त्यावेळी त्यांनी सांगितलं की आता राजकारणात तशी मॉडेल्स राहिलेली नाहीत.
राऊतांनी म्हटलं की, आज देशात मोदी आहेत, फडणवीस आहेत, अमित शाह आहेत. जी आज देशात गडबड चालू आहे. आज जर बाळासाहेब असते तर त्यांना आजही हातात कुंचला घेऊन फटकारे मारावे असे वाटले असते, असं राऊत म्हणाले.
गोवा निवडणुकीवर बोलताना ते म्हणाले की, गोव्यामध्ये असं चित्र आहे जे मुळचे भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत ते बाहेर पडत आहेत. उत्पल पर्रीकर यांनी पक्षाचा त्याग केला आहे. लक्ष्मीकांत पारसीकर जरी भारतीय पक्षाचा मुख्य चेहरा आहे आज हे सगळे बाहेर पडत आहेत. भ्रष्टाचाराचे व्यभिचाराचे खंडणीचे आरोपी असणारे हौशे नवशे भारतीय जनता पक्षाचे चेहरे झाले आहेत, असं ते म्हणाले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha