भाजपच्या बेताल माकडचेष्टा पाहून बाळासाहेब काय म्हणाले असते? 'रोखठोक'मधून संजय राऊत म्हणतात...
महाराष्ट्रातील भाजपच्या बेताल माकडचेष्टा पाहून बाळासाहेबांनी कोणत्या मार्मिक टिपण्या केल्या असत्या? त्यांच्या मनात कोणत्या रेषा उमटल्या असत्या? असं संजय राऊत (Sajay Raut) यांनी म्हटलं आहे.
मुंबई : आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांची जयंती आहे. या निमित्ताने त्यांना सर्व स्तरांतून अभिवादन केलं जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sajay Raut) यांनी सामनातील आपल्या रोखठोक कॉलममधून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे. रोखठोकमधून बाळासाहेबांना अभिवादन करताना त्यांनी म्हटलं आहे की, आज बाळासाहेब असते तर महाराष्ट्रातील भाजपच्या बेताल माकडचेष्टा पाहून बाळासाहेबांनी कोणत्या मार्मिक टिपण्या केल्या असत्या? त्यांच्या मनात व्यंगचित्रांच्या कोणत्या रेषा उमटल्या असत्या? असं म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये म्हटलं आहे की, बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर ते 96 वर्षांचे असते. योद्ध्याचे वय मोजायचे नसते. मृत्यूनंतरही तो जिवंतच असतो व लढण्याची प्रेरणा देत असतो. बाळासाहेब ठाकरे हे त्या अर्थाने कधीच म्हातारे झाले नाहीत. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांचे वाढदिवस जोरात साजरे झाले, पण वय मोजलेले त्यांना आवडत नसे. बाळासाहेब म्हणजे राजकारणातला एक मनोवेधक विषय ठरला. त्यांचे आयुष्य म्हणजे कृतींनी गजबजलेले मनोहारी नाट्यच होते. त्या नाट्यास बहुरंगी छटा होत्या. महाराष्ट्रात आज शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. या स्थितीत बाळासाहेब ठाकरे ‘मातोश्री’वर असते तर त्यांची काय भूमिका असती, असा मिश्कील प्रश्न अनेकांना पडल्याशिवाय राहात नाही. विशेषतः महाराष्ट्रातील भाजपच्या बेताल माकडचेष्टा पाहून बाळासाहेबांनी कोणत्या मार्मिक टिपण्या केल्या असत्या? त्यांच्या मनात व्यंगचित्रांच्या कोणत्या रेषा उमटल्या असत्या?, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
“बाळासाहेब हे व्यंगचित्रकार होते. त्यांनी कुंचल्यांचे फटकारे मारायला सुरू केले तेव्हा पंडित नेहरू, गुलझारीलाल नंदांपासून स. का. पाटील, मोरारजी देसाई, इंदिरा गांधी असे लोक राजकारणात होते. जगजीवनराम, इंदिरा गांधी, मोरारजींवर व्यंगचित्रकार म्हणून त्यांचा विशेष लोभ होता. बाळासाहेबांनी व्यंगचित्र काढणे सोडले तेव्हा ते म्हणाले, “मी फटकारे मारावेत अशी मॉडेल्स आता राहिली नाहीत.’’ पण अचानक राजकारणात नरसिंह राव, सीताराम केसरी, सोनिया गांधींचा उदय झाला तेव्हा ते हळहळले. ‘‘मी कुंचला खाली ठेवल्यावर ही ‘मॉडेल्स’ आली. यांच्यावर व्यंगचित्रे काढताना मजा आली असती.’’ अमित शहा, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, भगतसिंह कोश्यारी यांच्याविषयी बाळासाहेब व्यंगचित्रकार म्हणून काय विचार करतात हे पाहायला धम्माल आली असती. आज राजकारणात व्यंगबहार सुरू असताना बाळासाहेब आपल्यात नाहीत,” अशी खंत संजय राऊतांनी व्यक्त केली आहे.
बाळासाहेब ठाकरे आज शिवतीर्थावर विसावले आहेत. 23 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस. त्यांच्या हयातीत हा दिवस आनंदाचा उत्सव ठरत असे. संध्याकाळच्या सभेत ते भाषणाला उभे राहात. व्यासपीठावर त्यांचा स्वभाव गंभीर व उग्र वाटे (प्रत्यक्षात ते तसे नव्हते). त्यांच्या शुभ्र कपड्यांत, खांद्यावरील शालीत साधेपणा होता, तितकाच रुबाब होता. महाराष्ट्रासाठी आणि राष्ट्रासाठी त्यांनी काय केले, काय सोसले हे रोज सांगण्याची गरज नाही. ‘ठाकरे’ या नावातच त्यांचा त्याग व संघर्ष सामावलेला आहे. आज देशातील अनेक नेत्यांकडे, राजकारण्यांकडे पाहतो तेव्हा वाटते, महाराष्ट्रात काय, तर देशातही बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठा पुरुष निर्माण व्हायचा आहे,” असं संजय राऊत म्हणतात.