ईडी, सीबीआय, एनसीबीला सीमेवर पाठवा, सोबत किरीट सोमय्यांनाही पाठवा, आम्ही त्यांना दहशतवाद्यांचे पेपर देतो : संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काश्मीरमधील परिस्थिती (Jammu and Kashmir Issue), राज्यात केंद्रीय संस्थाच्या कारवायांवरुन भाजपवर (BJP) टीका केली आहे.
मुंबई : शिवसेना (Shiv Sena)खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काश्मीरमधील परिस्थिती (Jammu and Kashmir Issue), राज्यात केंद्रीय संस्थाच्या कारवायांवरुन भाजपवर (BJP) टीका केली आहे. संजय राऊतांनी म्हटलं आहे की, कधी काश्मिरी पंडितांना मारलं जात आहे. ही जबाबदारी केंद्र सरकार गृहमंत्रालयाची आहे. काश्मीरची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे एवढंच मी सांगू शकतो. ईडी, सीबीआय, एनसीबीला सीमेवर पाठवा, हे फार पावरफुल लोकं आहेत. सोबत किरीट सोमय्यांनाही पाठवा, आम्ही दहशतवाद्यांचे पेपर देतो, अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे.
संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, काश्मीरची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. तिथं दहशतवाद पुन्हा सुरू झालाय. सरसंघचालक बोलले ते योग्यच आहे. 370 कलम हटवूनही काही फरक पडलेला नाही. रोज लोकं मारली जात आहेत. ही गृहमंत्रालयाची जबाबदारी आहे. केवळ पाकीस्तान नाही तर चीनवर पण सर्जिकल स्ट्राईक करा. चीनपण लडाख, तवांगमध्ये घुसखोरी करतोय, असं राऊत म्हणाले. पाकिस्तानसोबत कसे संबंध प्रस्तापित करायचे याचा निर्णय सरकारला एकदा घेऊद्या मग आम्ही बोलू. तुम्ही तुमच्या मतलबाप्रमाणे राजकीय सोईच्या भूमिका घेता आणि काश्मिरची जनता रोज तिथे मरते आहे. हे चालणार नाही, असंही ते म्हणाले.
राऊत म्हणाले की, क्रिकेट खेळून, बंद करून काश्मीरची परिस्थिती बदलणार आहे का? पाकिस्तानसोबत कोणतेच संबंध ठेवू नका. तुम्ही तिकडे जाऊन केक कापता, असा टोलाही त्यांनी लगावला. ते म्हणाले की, काश्मीरमधील परिस्थिती कधी समोर येऊच दिली नाही, तिथं अनेक निर्बंध होते. गृहमंत्र्यांनी समोर येऊन परिस्थिती स्पष्ट करायला हवी.
राऊत म्हणाले की, चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर ज्या भाषेत टिका केलीय, त्यांची लायकी आहे का?, कुठे हिमालय आणि कुठे टेंगूळ. माझं महाविकास आघाडीतल सर्व मंत्र्यांना आवाहन आहे की, गप्प बसू नका. महाविकास आघाडीतील नेत्यांनी नुसतं खुर्च्यांवर बसू नये. टिकेला प्रति टिका करा, हे सारं बंद होईल, असं ते म्हणाले.