एक्स्प्लोर
मुंबईतील विक्रोळीत शिवसेना उपविभागप्रमुखावर गोळीबार, चंद्रशेखर जाधव गंभीर जखमी
खांद्याला गोळी लागल्याने चंद्रशेखर जाधव यांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतं. हल्ल्यानंतर स्थानिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. विक्रोळी पोलिसांनी त्याच्याकडील शस्त्रही जप्त केलं आहे.

मुंबई : महाराष्ट्रात पोलिसांचा धाक उरला का असा प्रश्न पडत आहे. कारण मंगळवारी (17 डिसेंबर) रात्री नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावरील गोळीबाराची घटना ताजी असतानाच, आज मुंबईतल्या विक्रोळीमध्येही गोळीबार झाला आहे. शिवसेना उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव (वय 56 वर्ष) यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. यात चंद्रशेखर जाधव जखमी झाले असून त्यांच्यावर गोदरेज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून हल्ल्याचं शस्त्र जप्त करण्यात आलं आहे.
आज (19 डिसेंबर) सकाळी सव्वासातच्या सुमारास ही घटना घडली. चंद्रशेखर जाधव सकाळी मुलासोबत नेहमीप्रमाणे विक्रोळीतील टागोरनगर इथल्या साईबाबा मंदिरात दर्शनाला गेले होते. त्यावेळी मंदिरातून बाहेर पडल्यानंतर हल्लेखोराने त्यांच्यावर तीन राऊंड फायर केले, ज्यात एक गोळी त्यांच्या डाव्या खांद्याला लागल्याची माहिती मिळत आहे. परंतु जाधव यांच्यावर हल्ला करण्यामागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
चंद्रशेखर जाधव यांच्या निकटवर्तीयांच्या माहितीनुसार, जाधव यांना काही दिवसांपासून धमक्या येत होत्या. त्यामधूनच हा हल्ला झाला आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत. पोलिस उपायुक्त अखिलेश कुमार सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.
खांद्याला गोळी लागल्याने चंद्रशेखर जाधव यांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतं. हल्ल्यानंतर स्थानिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. विक्रोळी पोलिसांनी त्याच्याकडील शस्त्रही जप्त केलं आहे. आता चौकशीतच हल्ल्याचं कारण समोर येईल. दरम्यान, विक्रोळी हा शिवसेनेचा गड समजला जातो. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे.
नागपूरच्या महापौरांवर गोळीबार
नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्या गाडीवर मंगळवारी (17 डिसेंबर) रात्री अज्ञातांनी गोळीबार केला होता. सुदैवाने या घटनेत संदीप जोशी थोडक्यात बचावले. मंगळवारी संदीप जोशी यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. या निमित्ताने ते कुटुंबासह निवडक मित्रांसह आऊटर रिंग रोडवरील धाब्यावर जेवायला गेले होते. परत येत असताना जोशी यांच्या कारवर बाईकवरुन आलेल्या हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
क्रिकेट
अहमदनगर
Advertisement
Advertisement
























