ग्राहकांचं समाधान होत नाही तोपर्यंत स्मार्टमीटर चालणार नाही, अंधेरीतील अदानी इलेक्ट्रिसिटीमध्ये ठाकरे गटाची धडक
Adani Electricity Smart Meter : अदानी इलेक्ट्रिसिटीकडून लावण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमध्ये वाढीव बिल येत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी होत्या. त्या पार्श्वभूमीवर अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाने अधिकाऱ्यांची भेट घेतली.
मुंबई : अदानी इलेक्ट्रिसिटीकडून लावण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरला ग्राहकांसोबत आता शिवसेना ठाकरे गटानेही विरोध दर्शवला आहे. जोपर्यंत ग्राहकांचं स्मार्ट मीटर संदर्भात समाधान होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे स्मार्ट मीटर लावण्यात येऊ नये अशा प्रकारची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली. तशाप्रकारे अदानी इलेक्ट्रिसिटी अधिकाऱ्यांकडून पत्रही लिहून घेण्यात आलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली अंधेरीतील अदानी इलेक्ट्रिसिटी कार्यालयाला भेट देण्यात आली. ग्राहकांच्या प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने ठाकरे गटाच्या नेत्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली. जे स्मार्ट मीटर लावण्यात आले आहेत त्या स्मार्ट मीटर मध्ये वाढीव वीज बिल येत असल्याने ते स्मार्ट मीटर काढून टाकावेत अशी सुद्धा मागणी यावेळी ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आली.
अधिकाऱ्यांकडून लेखी लिहून घेतलं
अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर अनिल परब म्हणाले की, "वीज ही अत्यवाश्यक सेवा आहे. लोकांचं हीत यामध्ये बघावं लागतं. ग्राहकांच्या घरी अदानी इलेक्ट्रिसिटीने स्मार्ट मिटर बळजबरीने बसविले आहे. या स्मार्ट मीटर मध्ये एक चिप बसवली आहे त्याचा कंट्रोल या ऑफिस मधून होतो अशी माहिती आहे. त्यामुळे वीज बिल भरायला एक दोन दिवस जरी उशीर झाला तरी वीज बंद केली जाते."
मुंबईच्या ग्राहकांची लूट थांबविण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. आमचा आणि ग्राहकांचं समाधान काही गोष्टींमध्ये होतं नाही तोपर्यंत स्मार्ट मीटर बसवणार नाही असं लेखी उत्तर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लिहून दिल्याची माहितीही अनिल परब यांनी दिली.
चार मागण्या सरकारकडे केल्या
अनिल परब म्हणाले की, "MERC ने पब्लिक हिअरिंग घेतली पाहिजे. लोकांच्या हितासाठी हे घेतलं पाहिजे. लोकांचा म्हणणं, लोकंप्रतिनिधींचं म्हणणं ऐकून त्यांनी घ्यावं. दुसरी मागणी अशी आहे की कॅश काउंटर सुरु केले पाहिजे. 50 हजार पर्यत कॅश ही नियमानुसार बिलासाठी घेतली पाहिजे. तिसरी मागणी अशी आहे की जे स्मार्ट मीटर लावले आहेत ते त्यांनी तातडीने काढावेत. चौथी मागणी म्हणजे शेतकऱ्यांना जे कृषी बिल माफ केलं तसं गरीब ग्राहकांना 300 युनिट पर्यंत विज बिल माफ करावं. या चार मागण्या आम्ही राज्य सरकारसमोर ठेवल्या आहेत."
ही बातमी वाचा: