एक्स्प्लोर
बलात्कार हा हत्येपेक्षा मोठा गुन्हा नाही, फाशीची शिक्षा अयोग्य, शक्ती मिल रेप प्रकरणी आरोपींची याचिका
मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या शक्ती मिल गँगरेप प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अन्सारी यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या तिघांनी सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

मुंबई : बलात्कार हा हत्येपेक्षा मोठा गुन्हा नाही, त्यामुळे त्यासाठी फाशीची शिक्षाही योग्य नसल्याचा युक्तिवाद शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात केला. शक्ती मिल गँगरेप प्रकरणी कलम 376 (ई) नुसार सुनावलेली फाशीची शिक्षा ही घटनाबाह्य आहे. फाशीची शिक्षा सुनावल्यामुळे आरोपींच्या मूलभूत हक्कांवरच गदा आली आहे. त्यामुळे या शिक्षेची अंमलबजावणी झाल्यास आरोपींचं फार मोठं नुकसान होईल, असा दावा याचिकाकर्त्यांचे वकील युग चौधरी यांनी हायकोर्टात केला आहे. मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या शक्ती मिल गँगरेप प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अन्सारी यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या तिघांनी सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर केंद्र सरकारने कलम 376 (ई) या कायद्यात सुधारणा करत संबंधित आरोपीने दोन वेळा बलात्काराचा गुन्हा केल्यास त्याला जन्मठेपेची अथवा फाशीची शिक्षा ठोठावू शकतो, अशी तरतूद करण्यात आली आहे. कायद्यातील या सुधारणेलाच तिघांनी या याचिकेतून आव्हान दिले आहे. पाच वर्षांनी अखेरीस गुरुवारपासून यावर सुनावणी सुरु झाली आहे. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठापुढे या संदर्भातील याचिकेवर सुनावणी सुरु आहे. मुंबईतील महालक्ष्मी येथील शक्ती मिल कंपाऊंडमध्ये 22 ऑगस्ट 2013 रोजी संध्याकाळच्या वेळी एक महिला छायाचित्रकार आपल्या सहकाऱ्यासोबत फोटाग्राफी करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्यावर पाच नराधमांनी बलात्कार केला होता. या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने आरोपी विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अंसारी, सिराज खान आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली. अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली तर सिराज खान याला जन्मठेपेची व इतर तीन आरोपींना मुंबई सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
आणखी वाचा























