'देशद्रोहींवर एखाद दुसरा दगड पडतोच'; संजय राऊतांचा सोमय्यांवर हल्लाबोल
Sanjay Raut On Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे.
Sanjay Raut On Kirit Somaiya : काल रात्रीच्या गोंधळानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे. एक खोटारडा माणूस काल जातीचं खोटं प्रमाणपत्र घेऊन निवडणूक लढवणाऱ्या दुसऱ्या आरोपीला भेटायला गेला. 'देशद्रोही आणि गुन्हेगारांवर एखाद दुसरा दगड पडतोच' अशा शब्दात संजय राऊतांनी सोमय्यांवर टीका केली आहे. शिवसैनिक आक्रमक झाले असतील तर होय शिवसेना शिवसैनिकांचं समर्थन करते, असंही ते म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, तुमच्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासाबाबत आम्ही तुम्हाला विचारतो का? मग पोलिसही जर कारवाई करत असतील तर काही असेल तरच कारवाई होईल ना असा सवाल राऊतांनी केला. त्यांनी म्हटलं की, जे देशद्रोही, गुन्हेगार आहेत त्यांच्याविषयी भाजपला एवढी मळमळ का? असंही ते म्हणाले.
राऊत म्हणाले की, केंद्राची झेड प्लस सिक्युरिटी हा एक मोठा घोटाळा आहे. किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानचे सर्व अकाऊंट चेक करायला हवेत. देणगीदारांची नावं देतो, अनेक देणगीदारांवर ईडीची कारवाई सुरु आहे. देणगीदारांची कॅरेक्टर तपासा. जर किरीट सोमय्या जास्त बोलत असतील तर त्यांच्या तोंडात कागद घालेन, असंही राऊत म्हणाले. एफआयआर काय असावी हे विक्रांत घोटाळा केलेल्या आरोपीनं सांगू नये. आरोपीनं फार बोलू नये, असंही राऊत म्हणाले.
फडणवीसांच्या आरोपावर बोलताना राऊत म्हणाले की, जर मुंबई पोलिस पक्षाच्या सांगण्यावर काम करतात असं त्यांना वाटत असेल तर न्यायव्यवस्था, तपास यंत्रणा कोणासाठी काम करतात. जर महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेबाबत विरोधी पक्ष नेत्यांना काही प्रश्न असतील तर आधी मुख्यमंत्र्यांना भेटा. नंतर तुम्हाला काय केंद्रात भेटायचं असेल, युनोत जायचं असेल तिकडे जा, असं राऊत म्हणाले. वैफल्यग्रस्त माणूस फडणविसांसारखी वक्तव्य करतो, असंही ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
काल माझ्यावर झालेला हल्ला ठाकरे सरकारकडून स्पॉन्सर्ड : किरीट सोमय्या