'50 रेड्यांचा नायनाट होणार, तुम्ही शिवसेना नाही, तुमचे नशीब फोडले'; संजय राऊतांचा हल्लाबोल
शिवसेनेच्या स्थापनेनंतर 180 सेना निघाल्या. पण दोनच टिकल्या भारतीय सेना आणि एक आपली सेना. बदला घेतला म्हणत आहेत, शिवसेनेचा बदला घेणाऱ्यांचे 100 पीतर खाली यायला हवे. आम्ही बदला घेऊ, असं राऊत म्हणाले
Sanjay Raut On Shinde Group: खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊतांनी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात म्हटलं की, शिवसेनेच्या स्थापनेनंतर 180 सेना निघाल्या. पण दोनच टिकल्या भारतीय सेना आणि एक आपली सेना. बदला घेतला म्हणत आहेत, शिवसेनेचा बदला घेणाऱ्यांचे 100 पीतर खाली यायला हवे. आम्ही बदला घेऊ, असं राऊत म्हणाले.
राऊतांनी म्हटलं की, पन्नास रेडे परत गुवाहाटीला जात आहेत. हवं ते दर्शन करून या. सुदर्शन आमच्या हातात आहे. या पन्नास रेड्यांचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही. या मुंबईसाठी पन्नास वर्षे शिवसेनेने रक्ताचे पाणी केले. तुम्ही शिवसेना फोडली नाही तुमचे नशीब फोडले आहे, असंही ते म्हणाले.
राऊत म्हणाले की, आम्ही शिवसेनेचे वारसदार आहोत. तुम्ही औरंगजेबचे वारसदार आहात. शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना गप्प आहेत. इतिहास बदलण्याचे काम सुरू आहे. या मुंबईसाठी पन्नास वर्षे शिवसेनेने रक्ताचे पाणी केले. तुम्ही शिवसेना फोडली नाही तुमचे नशीब फोडले आहे. हा ईशान्य मुंबई शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मिंधे गटाला इथला बाल बाका करता आला नाही. या पुढे आपल्या नशिबात दिवाळी आणि इतरांच्या होळी असेल. हे प्रेम फक्त निष्ठावंतांना मिळते. ही खोक्यावाल्यांची शिवसेना नाही. खोकेवाल्यांनी समोर येऊन पाहावे, असंही राऊत म्हणाले.
संजय राऊतांनी म्हटलं की, 110 दिवस तुरुंगात राहिलो आता 110 आमदार निवडून आणणार आणि मुख्यमंत्री शिवसेनेचा बसवणार, असा दावा देखील राऊतांनी केला.
तुम्हाला लिहून देतो हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार लिहून घ्या- आदित्य ठाकरे
याच कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, तुम्हाला लिहून देतो हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार लिहून घ्या. जयपूरला गेलो होतो. तिकडे ही पन्नास खोके एकदम ओके असं लोकं म्हणायचे. मला एका गद्दाराकडून मेसेज आला, आम्हाला गद्दार म्हणून नका विश्वासघातकी म्हणा. चोरी करायला चाळीस लोक गरजेचे असतात. आज चाळीस गद्दारांना चॅलेंज करतो. तुम्ही बंड केला म्हणता तर राजीनामा द्या आणि समोर या. डरपोक होता म्हणून पळून गेलात, असं ते म्हणाले. गद्दार पहिले कुठे पळाले तिथे तिथे प्रकल्प पाठवत आहेत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.