सचिन वाझे यांना वकिलाची गरज नाही, कारण त्यांच्यासाठी अॅडव्होकेट उद्धव ठाकरे आहेत : देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात लबाड सरकार म्हणजे ठाकरे सरकार असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसंच सचिन वाझे यांना वकिलाची गरज नाही, कारण त्यांच्यासाठी अॅडव्होकेट उद्धव ठाकरे आहेत, असा टोलाही लगावला.
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानाची आज सांगता झाली. यावेळी सरकारच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणत्याही रडगाण्याशिवाय अधिवेशन पार पडल्याचं म्हटलं. मात्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ठाकरे सरकारला लबाड असं म्हटलं. महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात लबाड सरकार म्हणजे ठाकरे सरकार असल्याची टीका त्यांनी केली. तसंच सचिन वाझे यांना वकिलाची गरज नाही, कारण त्यांच्यासाठी अॅडव्होकेट उद्धव ठाकरे आहेत, असा टोलाही लगावला.
सरकारने राज्यातील शेतकरी, सामान्यांना शॉक दिला
"अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मोठ्या थाटात घोषित करायचं की सामान्य शेतकऱ्याचं वीज तोडणीला स्थगिती द्यायची आणि शेवटच्या दिवशी ती स्थगिती उठवायची, ही सगळ्यात मोठी लबाडी आहे. ही स्थगिती उठवताना दिलेली कारण चुकीची, विसंगत आणि असत्य आहेत. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, गरीब वीज ग्राहकांना, ग्रामीण-शहरी ग्राहकांना या सरकारने आज विजेचा शॉक दिला आहे, आणि ही सर्वात मोठी लबाडी आहे," अशी टीका फडणवीस यांनी केली.
पीकविम्यावरुन फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा
पीकविम्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीका केला. "शेतकऱ्याला बांधावर जाऊन कर्जमुक्त करणार असं सांगितलं होतं, पण शेतकऱ्याला एक नवा पैसा दिला नाही. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची फसवणूक या सरकारने केली आहे. पीकविम्याच्याबाबतीत चुकीची माहिती सरकारने दिली. यंदा सरकारने पीकविम्याचे निकष बदलले, त्याचा फायदा कंपन्यांना झाला, शेतकऱ्यांना नाही. चार वर्षात एकदाही तक्रार आली नाही, पीकविमा मिळाला, शिवसेना आंदोलन करत होती. आता त्यांचं सरकार असताना पीकविमा मिळत नाही आणि ते केंद्राकडे बोट दाखवतात आणि मूग गिळून गप्प बसतात. ही पूर्णपणे शेतकऱ्यांची निराशा आहे," असं फडणवीस म्हणाले.
कायदा-सुव्यवस्थेवरुन सरकारचे धिंदवडे काढले
"कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात आम्ही सरकारचे अक्षरश: धिंदवडे काढले. त्याची उत्तरंही सरकार देऊ शकलं नाही. पाच बलात्कारासंदर्भात स्थगन प्रस्ताव दिले नाही, पण कोणत्याही प्रस्तावावर कारवाई केली नाही," असा दावाही फडणवीस यांनी केला.
सचिन वाझे यांच्यासाठी अॅडव्होकेट उद्धव ठाकरे आहेत
"सचिन वाझे यांना वकिलाची गरज नाही. त्यांच्यासाठी अॅडव्होकेट उद्धव ठाकरे आहेत. ज्यांच्याविरुद्ध एवढे पुरावे आहेत, त्यांना उद्धव ठाकरे डिफेंड करत आहेत. मला समजत नाही की अशी कोणती माहिती त्यांच्याकडे आहे की त्यांना वाचवलं जात आहे? तो ओसामा बिन लादेन नाही हे आम्हालाही माहित आहेत. पण मुख्यमंत्र्यांचे निर्णय तुघलकी आहे असं म्हणणं संयुक्तिक ठरेल," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.