1857 नंतर भारताबाबत गैरसमज पसरवले गेलेत, आपला देश विश्वगुरू बनेल; सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य
Mohan Bhagwat News: सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, आज आपण अशा स्थितीत आलो आहोत की, जग म्हणतंय भारताचे अनुकरण केलं पाहिजं. आता आपण जगाची आशा आहोत.
Mohan Bhagwat News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी रविवारी (9 एप्रिल) मुंबईत (Mumbai News) एका कार्यक्रमाला संबोधित केलं आहे. या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, भारताचा 'विश्वगुरु' होण्याच्या दिशेनं होणारी प्रगती मंदावण्यासाठी त्याबाबत गैरसमज आणि विकृत माहिती पसरवली जात आहे. आसुरी शक्ती आपल्याला मारण्याचा प्रयत्न करतील. या लढाईसाठी लोकांना तयार करावं लागेल.
मोहन भागवत म्हणाले की, देशाविषयी असे गैरसमज 1857 नंतर (पहिल्या स्वातंत्र्ययुद्धानंतर) पसरवले गेले, परंतु स्वामी विवेकानंदांनी अशा घटकांना चोख प्रत्युत्तर दिलं. जगात कोणीही तर्काच्या आधारे आपल्याशी वाद घालू शकत नसल्यानं आपली प्रगती मंदावण्यासाठी हे गैरसमज पसरवले जात असल्याचंही ते म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांनी सांगितलं की, तत्व आणि व्यवहार याला सोबत घेऊन चाललं पाहिजे, तसेच आपल्या जीवनाचं आपण सार्थक केलं पाहिजे. हा देश विश्वगुरु बनावं, असं मला वाटतं ज्यांना वाटत नाही ते देखील विचार करत असतील की, भारत मोठा झाला पाहिजे. संपूर्ण भारत राष्ट्र या नात्यानं उभा राहिला पाहिजे, अशी तयारी आम्ही करतोय. आज आपण या स्थितीत आहोत की, जग म्हणतंय भारताचं अनुकरण करा, यासाठी संघर्षांची खूप गरज आहे. 20, 30 वर्षांमध्ये भारतात विश्वगुरू आम्ही पाहत आहोत. त्यामुळे येणाऱ्या पिढीला आम्ही तयार करत आहोत.
"आपला देश जगाचा नेता बनेल"
आपला देश विश्वगुरू बनेल यावर माझा पूर्ण विश्वास असल्याचं मोहन भागवत म्हणाले. येत्या 20-30 वर्षांत भारत विश्वगुरू होताना मी पाहत आहे. पिढ्यानपिढ्या यासाठी तयार राहिल्या पाहिजेत. याआधी शनिवारी भागवत यांनी संघटित कार्यशक्तीच्या महत्त्वावर भर दिला होता आणि आपण विश्वकल्याणाचे मूक पुजारी आहोत, असं म्हटलं होतं. त्याचबरोबर सेवेसाठी योग्य आणि उत्कृष्ट कामगार बनण्याची प्रतिज्ञा घेण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.
"निःस्वार्थपणे सेवा करा"
निःस्वार्थ सेवेवर भर देत ते म्हणाले की, कार्यकर्ता कामाच्या स्वरूपाशी निगडित असतो, मग काम होतं. आपल्या कामानुसार आपण कामगार व्हायला हवं, अशी समज आपल्याला विकसित करावी लागेल. सेवाकार्य मनाच्या तळमळीनं केलं जातं. आपल्याला जगाच्या कल्याणासाठी काम करावं लागेल. त्यामुळे कामगारांचा मोठा गट तयार करावा लागेल. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कोणताही स्वार्थ न ठेवता समाजसेवा करण्याचं आवाहन केलं.
"चांगल्या जगासाठी काम करतोय"
मोहन भागवत म्हणाले की, "आपल्याला चांगल्या जगासाठी काम करावं लागेल. प्रसिद्धी मिळवण्यापासून दूर राहिलं पाहिजे. समाजसेवा केलीत तर लोकप्रिय व्हाल, पण त्यावर लक्ष केंद्रीत करू नये. तुमचा अहंकार अडथळा नसावा. जर तुम्हाला लोककल्याणाचं काम करायचं असेल तर तुम्ही आक्रमक नसून विनम्र असलं पाहिजे."
दरम्यान, चौगुले उद्योगसमूहाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्राबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही आपला ठसा उमटविल्याने अशोकराव चौगुले अमृतमहोत्सव समिती'तर्फे त्यांचा अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते 'THE RSS MANU AND I' आणि 'FOUR DECADES OF HINDU RENAISSANCE' या दोन पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं आहे. तसेच या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि संघाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.