नाताळच्या प्रार्थनेत गाव तल्लीन, दोन बंगल्यांवर दरोडा, 25 तोळं सोनं आणि पैसे घेऊन चोर पसार
वसईत सध्या सर्वत्र नाताळची धूम पाहायला मिळत आहे. प्रार्थना आणि नाताळच्या सेलिब्रेशनसाठी सर्व लोक काल रात्रीपासून चर्चमध्ये होते. चोरांनी याच संधीचा गैरफायदा घेत दोन मोठ्या चोऱ्या केल्या आहेत.
वसई : वसईत सध्या सर्वत्र नाताळची धूम पाहायला मिळत आहे. प्रार्थना आणि नाताळच्या सेलिब्रेशनसाठी सर्व लोक काल रात्रीपासून चर्चमध्ये होते. चोरांनी याच संधीचा गैरफायदा घेत दोन मोठ्या चोऱ्या केल्या आहेत. नाताळच्या पहिल्या प्रार्थनेसाठी संपूर्ण कुटुंब आणि गाव चर्चमध्ये गेलेलं असताना चोरांनी दोन बंगल्यांवर डल्ला मारला. दोन बंगल्यांमधील मिळून अंदाजे 73 हजार रोख आणि 25 तोळं सोनं घेवून चोर पसार झाले आहेत.
वसई - विरारमधील ख्रिस्ती बांधवांच्या घराघरात नाताळची धूम सुरु आहे. 24 डिसेंबरच्या रात्री प्रत्येकजण नाताळच्या पहिल्या प्रार्थनेसाठी चर्च मध्ये जातो. पण हिच संधी साधत चोरांनी नालासोपारा पश्चिमेकडील नवाळे परिसरातील सराई या कुटुंबियांच्या दोन बंगल्यांवर दरोडा टाकला आहे. दरवाजाची कडी तोडून घरातल्या कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोर फरार झाले आहेत. चर्चमधील प्रार्थनेनंतर घरी परतल्याव ही घटना उघड झाली आहे.
नालासोपारा पश्चिमेकडील नवाळे परिसरात संजाव सराई आणि अॅन्थोनी सराई यांचे बंगले आहेत. नाताळनिमित्त ही दोन्ही कुटुंब रात्री सव्वा नऊच्या सुमारास प्रार्थनेसाठी चर्च मध्ये गेले होते. तसेच आजूबाजूचे गावकरीही चर्चमध्ये गेले होते. हीच संधी साधून चोरांनी संजाव सराई यांच्या बंगल्यातील अंदाजे 15 ते 16 तोळे सोने आणि 53 हजाराची रोख रक्कम तर अॅन्थोनी सरोई यांच्या बंगल्यातील अंदाजे 20 हजार रुपये रोख आणि 10 तोळे सोने घेऊन पळ काढला आहे.