RBI बिल्डिंग बाँबने उडवून देणाऱ्या आरोपींना 3 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी, आरोपींचा दहशतवादी गटाशी संबंध आहे का याचा तपास सुरू
Reserve Bank Of India : गुजरातमधून अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींचा दहशतवादी गटाशी संबंध आहे का याचा तपास करायचा असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला.
मुंबई: आरबीयआयसह (Reserve Bank Of India) मुंबईतील 11 ठिकाणी बॉम्बने उडवून देणार अशी धमकी देणाऱ्या आरोपींना 3 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. गुजरात राज्यातील वरोडावरून या तीनही आरोपींना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. यामध्ये संशयित आरोपी आशिष टोपाला हा उच्चशिक्षित असून त्याला सायबर सेवा इंटरनेटचे बरेचसे ज्ञान आहे, त्यामुळे आरबीआयच्या साईटमध्ये हॅकिंग झालं आहे का, त्यांचा दहशतवादी गटाशी संबंध आहे का याचा तपास करावा लागेल असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
RBI धमकी प्रकरणात पोलिसांनी आशिष टोपाला, आदिल रफिक, वसीम अशा तीन संशयित आरोपींना गुजरातमधून ताब्यात घेतले आहे. या संशयित आरोपींना न्यायालयाच्या समोर सादर केलं असता न्यायालयाने त्यांना 3 जानेवारीपर्यंत यांना पोलीस कोठडी सुनावली. आरबीआय बँकेसह मुंबईतील 11 ठिकाणी बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्यानंतर बॉम्ब शोध पथकाच्या मदतीने आरबीआय बँकेतील संपूर्णपणे तपासणी करण्यात आली होती. यावेळी आरबीआय बँकेत काम करत असणाऱ्या 1500 लोकांना बाहेर काढून ही तपासणी करण्यात आली होती.
याच प्रकरणात आरोपींना शोधण्यासाठी एटीएस, क्राइम ब्रांच आणि रमाबाई आंबेडकर पोलीस ठाणे येथील तीन तुकड्या तयार करण्यात आल्या होत्या. तर तांत्रिक मदतीच्या आधाराने आरोपींना गुजरातवरून ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी न्यायालयासमोर सांगितले.
संशयित आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद
आदिलकडील सिमकार्ड वसीमला वापरण्यासाठी दिले होते. वसीम याला न कळतच त्याच्या सिमकार्ड वरून MAIL ID बनवण्यात आला. हा MAIL ID एकदाच वापरण्यात आला. त्यावर 22 डिसेंबर रोजी लॉगिन केलं आणि त्यानंतर 26 डिसेंबर रोजी धमकीचा मेल करण्यात आला.
या सिमकार्ड मधून या आधी कोणालाही किंवा कधीही कोणत्याही संस्थेला मेसेज किंवा मेल पाठवलेला नाही हा रेकॉर्ड आहे. आशिष टोपाला हा बीबीए शिकलेला असून तंत्रज्ञान विज्ञान याचे शिक्षण घेतलेले नाही. बीबीए हा कोर्स बिझनेस मॅनेजमेंटशी जोडलेला जातो. संशयित आरोपीचे आधी कोणतेही क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही.
सरकारी वकिलांचा युक्तिवाद
धमकी आल्यानंतर आम्ही आरबीआय बिल्डिंगमध्ये तपास केला. दिलेली धमकी गंभीर स्वरूपाचे असून त्याठिकाणी डॉग स्कॉड घेऊन तपासणी केली आणि याच बिल्डिंगमध्ये आरबीआयचे गव्हर्नर यांचे देखील ऑफिस आहे. AlKhilafat@gmail.com या नावाने मेल तयार करण्यात आलेला असून त्याचा दहशतवादी गटाशी काही संबंध आहे का याचा तपास करायचा आहे. या प्रकरणात 506 (2) कलम लावण्यात आलं आहे. ते अजामीनपात्र आहे. आरबीआयच्या साईटची हॅकिंग वगैरे काही झालं आहे का याचा तपास करावा लागणार आहे. यामध्ये संशयित आरोपी आशिष टोपाला हा उच्चशिक्षित असून त्याला सायबर सेवा इंटरनेटचे बरेचसे ज्ञान आहे.
ही बातमी वाचा: