'रावणाचे जे झाले तेच यांचंही होईल', रवी राणांचा हल्लाबोल; तर फडणवीस म्हणाले, सरकारनं क्रौर्याच्या सीमा ओलांडल्या
Ravi Rana On Sanjay Raut : अहंकाराने मुख्यमंत्री सत्तेचा गैरवापर करत आहेत त्यामुळे रावणाचे जे झाले तेच यांचेही होईल, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.
Ravi Rana On Sanjay Raut : खासदार नवनीत राणा यांना डिस्चार्ज मिळणार असल्यानं त्यांचे पती आमदार रवी राणा काही वेळापूर्वीच लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्र्यांमध्ये अशा प्रकारचा अहंकार असेल तर एक लक्षात ठेवा रावणाचा सुद्धा अहंकार टिकला नाही. रामाने त्याचा सर्वनाश केला. अहंकाराने मुख्यमंत्री सत्तेचा गैरवापर करत आहेत त्यामुळे रावणाचे जे झाले तेच यांचेही होईल, असं राणा यांनी म्हटलं आहे. कारागृहात योग्य वागणूक मिळाली नसल्याच्या दाव्याचा रवी राणांनी पुनरुच्चार केला आहे. सोबतच त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा असल्याचे कोर्टाने सांगितल्यानंतरही त्यावर आक्षेप घेण्याचे काम संजय राऊत यांनी केले आहे. मला असं वाटतं संजय राऊत चवन्नीछाप आहेत. संजय राऊत कोर्टाच्या निर्णयावरही टीका करतात, असं राणा यांनी म्हटलं आहे.
हनुमानाचे नाव घेतल्यावर आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो हे महाराष्ट्राचे दुर्दैव
राणा यांनी म्हटलं की, मी कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो. कोर्टाने जो निर्णय दिला त्याचे आम्ही पालन करणार आहोत. राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा असल्याचे कोर्टाने सांगितल्यानंतरही त्यावर आक्षेप घेण्याचे काम संजय राऊत यांनी केले आहे. आम्हाला 20 फूट खोल गाडण्याची धमकी देतात. संजय राऊतांवर महाराष्ट्रावर गुन्हा दाखल होत नाही. पण हनुमानाचे नाव घेतल्यावर आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
रवी राणा यांनी म्हटलं की, जेव्हा पोलीस आमच्या घरी आले होते तेव्हा आमच्यासोबत पोलीस स्टेशनला चला तुम्हाला जामीन देण्यात येईल असे सांगितले. आम्ही वॉरंट मागत असतानाही त्यांनी तडकाफडकी आम्हाला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा गाडीत बसताना शिवसैनिकांनी आमच्यावर दगड, पाण्याच्या बाटल्या फेकल्या. त्याच्यावर कारवाई केली नाही. आम्हाला पोलीस ठाण्यात नेऊन चहा पाजला. त्यानंतर रात्री सांताक्रूझला लॉकअपमध्ये ठेवल्यानंतर आम्हाला पाणीसुद्धा दिले नाही. उद्धव ठाकरे सरकार एका महिलेला घाबरल्याने त्यांनी एवढी सक्तीची कारवाई केली, असं त्यांनी म्हटलं.
रवी राणा यांनी म्हटलं की, खासदार संजय राऊत, अनिल परब आणि मुख्यमंत्री यांच्यामार्फत झालेल्या भ्रष्टाचाराच्या फाईल्सबाबत केंद्र सरकारने कारवाई केली पाहिजे. सत्तेचा दुरुपयोग करणारे उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही मागणी आम्ही दिल्लीकडे करणार आहोत. येणाऱ्या काळात राम भक्त आणि हनुमान भक्त उद्धव ठाकरेंना जागा दाखवतील.
नवनीत राणा यांना गुन्हेगारांपेक्षा वाईट वागणूक- फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, नवनीत राणा यांना गुन्हेगारांपेक्षा वाईट वागणूक देण्यात आली. राज्य सरकारनं क्रौर्याच्या सीमा ओलांडल्या आहेत, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. नवनीत राणा यांची तब्येत बरी होते आहे, पण त्यांना जी वागणूक दिली गेली ते गंभीर आहे, असं ते म्हणाले.