(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रतन टाटा यांची मुंबईतील 18 वर्षीय मराठमोळ्या तरुणाच्या फार्मसीमध्ये गुंतवणूक
रतन टाटा यांनी मुंबईतील 18 वर्षीय अर्जुन देशपांडे या मराठमोळ्या तरुणाच्या फार्मसीमध्ये गुंतवणूक केली आहे. जनरिक आधार या कंपनीत रतन टाटा यांनी 50 टक्क्यांची भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे.औषधांच्या किरकोळ बाजारातील व्यापाऱ्यांना बाजारभावापेक्षा कमी दरात औषधांचा पुरवठा करते. टाटा यांनी ही गुंतवणूक वैयक्तिक पातळीवर केली आहे.
मुंबई : टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी मुंबईतील 18 वर्षांच्या मराठमोळ्या तरुणाच्या फार्मसीमध्ये गुंतवणूक केली आहे. रतन टाटा यांनी अर्जुन देशपांडे याच्या 'जनरिक आधार' कंपनीत 50 टक्क्यांची भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी औषधांच्या किरकोळ बाजारातील व्यापाऱ्यांना बाजारभावापेक्षा कमी दरात औषधांचा पुरवठा करते.
दरम्यान अर्जुन देशपांडेने या व्यवहाराच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. परंतु रतन टाटा यांच्यासोबत किती रकमेत हा व्यवहार झाला याबाबत अधिक माहिती देण्यास त्याने नकार दिला. राहुल देशपांडेने दोन वर्षांपूर्वी आपल्या आई-वडिलांकडून भांडवल घेऊन हा व्यवसाय सुरु केला होता.
चार महिन्यांपासून बोलणी सुरु अर्जुन देशपांडे याच्या माहितीनुसार, "उद्योजक रतन टाटा मागील तीन ते चार महिन्यांपासून माझ्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करत होते. टाटा यांना माझ्या व्यवसायात भागीदार बनायचं होतं. सर रतन टाटा यांनी दोन दिवसांपूर्वीच 'जनरिक आधार'मध्ये 50 टक्क्यांची भागीदारी केली आहे. यासंदर्भातील औपचारिक घोषणा लवकरच केली जाईल."
वैयक्तिक पातळीवर गुंतवणूक "रतन टाटा यांनी ही गुंतवणूक वैयक्तिक पातळीवर केली आहे. या व्यवहाराचा टाटा समूहाशी कोणताही संबंध नाही," अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधीही रतन टाटा यांनी ओला, पेटीएम, स्नॅपडील, क्योरफिट, अर्बन लॅडर, लेन्सकार्ट आणि लायब्रेट सारख्या अनेक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे.
दोन वर्षांपूर्वी 'जनरिक आधार'ची सुरुवात अर्जुन देशपांडेने दोन वर्षांपूर्वी 'जनरिक आधार'ची सुरुवात केली होती. सध्या कंपनीची वार्षिक उलाढाल 6 कोटी रुपये आहे. ही कंपनी युनिक फार्मसी अॅग्रिगेटर बिझनेस मॉडलचा वापर करते. यामध्ये थेट उत्पादकांकडून जनरिक औषधं खरेदी करुन ती किरकोळ बाजारातील व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवली जातात. ही कंपनी प्रामुख्याने डायबेटिज आणि हायपरटेंशनच्या औषधांचा पुरवठा करते. पण लवकरच कमी किंमतीत कॅन्सरची औषधां पुरवठा करण्याचा कंपनीचा मानस आहे.
कंपनीचा विस्तार करण्याची योजना मुंबई, पुणे, बंगळुरु आणि ओदिशाचे सुमारे 30 किरकोळ व्यापारी या कंपनीशी जोडले गेले असून प्रॉफिट शेअरिंग मॉडल त्यांनी स्वीकारलं आहे. जनरिक आधारमध्ये 55 कर्मचारी आहेत, ज्यात फार्मासिस्ट, आयटी इंजिनीअर आणि मार्केटिंग प्रोफेशनलचा समावेश आहे.
"एक वर्षात जनरिक आधार अंतर्गत 1,000 फ्रेंचायजी मेडिकल स्टोअर सुरु करण्याची आमची योजना आहे. आम्ही आमच्या व्यवसायाचा विस्तार महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि दिल्लीपर्यंत करणार आहोत," असं अर्जुन देशपांडेने सांगितलं.