(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rashmi Shukla: रश्मी शुक्ला यांना बढती, सशस्त्र सीमा बल महासंचालकपदी नियुक्ती, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पत्र जारी
Rashmi Shukla Phone Tapping Case : फोन टॅपिंग प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर रश्मी शुक्ला यांची हैदराबादमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) अतिरिक्त महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
मुंबई: वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि CRPF च्या अतिरिक्त महासंचालक रश्मी शुक्ला यांना सशस्त्र सीमा बलच्या (Sashastra Seema Bal) महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून यासंबंधित पत्र जारी करण्यात आलं आहे. रश्मी शुक्ला यांच्याकडे ही जबाबदारी 30 जून 2024 पर्यंत असणार आहे असं या पत्रात म्हटलं आहे. राज्यात भाजप सरकार सत्तेत असताना रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप (Rashmi Shukla Phone Tapping Case ) होता.
दरम्यान, रश्मी शुक्ला यांना केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबादमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) अतिरिक्त महासंचालक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना बढती देण्यात आली असून सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर शिंदे-फडवणीस सरकार सत्तेत आलं. त्यानंतर रश्मी शुक्ला यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती होणार असल्याची चर्चा होती. रश्मी शुक्ला यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. रश्मी शुक्ला यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती.
Rashmi Shukla Phone Tapping Case : रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात क्लीन चिट
पुणे पोलिसांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात 'क्लोजर रिपोर्ट' दाखल केला आहे. यामध्ये काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कोर्टाने असा अहवाल स्वीकारला की केस बंद केली जाते. एखादा गुन्हा चुकून नोंदवला गेला किंवा तक्रार दिवाणी स्वरूपाची असल्याचे आढळून आल्यास पोलिसांकडून 'क्लोजर रिपोर्ट' दाखल केला जातो.
वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी यांच्या विरोधात फेब्रुवारी 2022 मध्ये येथील पुण्यातील बंडागार्डन पोलिस ठाण्यात भारतीय टेलिग्राफ कायद्याच्या कलम 26 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेतृत्वाखालील उद्धव ठाकरे सरकार सत्तेवर होते. शुक्ला पुण्याच्या पोलिस आयुक्त असताना भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात नाना पटोले आणि इतर नेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करण्यात आले होते, असा आरोप करण्यात आला होता.
ही बातमी वाचा: