खासदार कुमार केतकर ठाण्यातील रुग्णांसाठी सरसावले, खासदार निधीतून अडीच कोटींची मदत
कुमार केतकर यांनी आपल्या खासदार निधीतून अडीच कोटी रुपयांची मदत ठाण्यातील दहा रुग्णालयांना केली आहे.
ठाणे : राज्यसभा खासदार आणि लोकसत्ताचे माजी संपादक कुमार केतकर यांनी आपल्या खासदार निधीतून अडीच कोटी रुपयांची मदत ठाण्याच्या जिल्हा रुग्णालयाला केली आहे. ठाणे जिल्ह्यातील दहा रुग्णालयांना प्रत्येकी 25 लाख रुपये यांच्या खासदार निधीतून देण्यात येतील. शुक्रवारी (7 मे) जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांनी या निधीबाबतचे पत्र त्यांना दिले.
Covid-19 ची पहिली लाट आरोग्य यंत्रणा उभी करण्यात गेली, तर दुसऱ्या लाटेत आणखी मोठे प्रश्न उद्भवले, अशा वेळी आपली आरोग्य यंत्रणा किती कमकुवत आहे हे समोर आले. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांना चांगल्या सोयी उपलब्ध व्हाव्यात, तिथे चांगली यंत्रणा असावी यासाठी हा निधी कुमार केतकर यांनी देऊ केला आहे.
ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या काळात रुग्णसेवा आणि रुग्णालये यांच्यातील उणिवांमुळे प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्ण वाढल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान आता आपण तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने तयारी करत असताना खासदार कुमार केतकर यांची अडीच कोटीची मदत ही मोलाची ठरणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील दहा रुग्णालयांना प्रत्येकी 25 लाखांचा निधी देण्यात आला आहे. यामध्ये रुग्णालयाच्या सुविधा वाढविण्यासाठी हा निधी खर्च व्हावा आणि जिल्ह्यातील रुग्णांना चांगली रुग्णसेवा मिळावी म्हणून खासदार केतकर यांनी खासदार निधीचा विनियोग जिल्ह्यासाठी व्हावा म्हणून अडीच कोटीची मदत केलेली आहे. त्यांची ही मदत तिसऱ्या लाटेच्या तयारीच्या दृष्टीने अतिशय मोलाची आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केली.