Rajya Sabha Election 2022 : संभाजीराजे यांचा गेम कुणी केला?
आधी शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली त्याच्यापाठोपाठ भाजपने ही तिसऱ्या जागेसाठी मोर्चेबांधणी केल्यामुळे संभाजीराजेंना राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्याशिवाय तूर्त तरी पर्याय दिसत नाही.
मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याची घोषणा केली आणि संभाजीराजे यांच्यासाठी हाच निर्णय सर्वात अडचणीचा ठरला. कारण शिवसेना दुसऱ्या जागेसाठी निवडणूक लढत आहे आणि भाजपही तिसऱ्या जागेसाठी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे संभाजीराजेंचा गेम कुणी केला याची चर्चा सुरु झाली आहे.
सहा वर्ष राष्ट्रपती नियुक्त खासदार असलेल्या संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी अपक्ष म्हणून राज्यसभेच्या मैदानात उतरण्याची घोषणा केली. खरंतर राज्यसभेच्या गणितानुसार यंदा महाविकास आघाडीकडून तिसरा उमेदवार सहज राज्यसभेवर जाऊ शकतो. त्यामुळेच संभाजी राजे यांना महाविकास आघाडीकडून अपेक्षा होती. पण शिवसेना दुसरा उमेदवार मैदानात उतरवल्यामुळे पहिल्याच प्रयत्नात त्यांची कोंडी झाली.
खरंतर सुरुवातीला संभाजीराजे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला असं राजे समर्थकांनी सांगितलं होतं. तसं पत्रकही काढलं. परंतु अजित पवार यांनी गेल्या वेळी राज्यसभेला शिवसेनेने राष्ट्रवादीला मदत केली होती याची आठवण करुन दिली आणि यावेळी शिवसेना ठरवेल तो निर्णय घेणार असं जाहीर केलं.
तर इकडे भाजपनेही तिसऱ्या जागेसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आणि केंद्राने सांगितलं तर तिसरा उमेदवार जिंकेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून पाठिंबा मिळावा यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पण उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी संभाजी राजे यांनी शरद पवार यांची भेट घेतली नाही. आणि संभाजी राजेंची इथेच चूक झाली का अशीही चर्चा आहे.
महाराज...
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 26, 2022
तुमच्या नजरेतलं #स्वराज्य मला घडवायचंय...
मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी...
मी बांधील असेन तो फक्त जनतेशी... pic.twitter.com/UnOir6CWSr
आधी शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली त्याच्यापाठोपाठ भाजपने ही तिसऱ्या जागेसाठी मोर्चेबांधणी केल्यामुळे संभाजीराजेंचा राज्यसभेसाठीचा हा प्रवास खडतर झाला आहे. त्यामुळे आता राजेंना राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्याशिवाय तूर्त तरी पर्याय दिसत नाही. पण या सगळ्या घडामोडीत संभाजी राजेंचा गेम नेमका कोणी केला याची चर्चा मात्र राजकीय वर्तुळात सुरु झाली.
संबंधित बातम्या