Rajya Sabha Election 2022: आव्हाड साहेब, राजकारणात डावपेच शिकून येणं गरजेचं; दीपाली सय्यद यांचा जितेंद्र आव्हाडांना खोचक सल्ला
Deepali Sayed: जे काही होणार आहे ते कायद्याप्रमाणे होणार आहे, मात्र मी आव्हाड साहेबांना इतकंच सांगेन की राजकारणात डावपेच असतात ते शिकून येणं गरजेचं आहे असं दीपाली सय्यद म्हणाल्या.
मुंबई: आताच राजकरण सूडबुद्धीच राजकारण आहे, त्यापासून आपण सांभाळून चाललं पाहिजे असा खोचक सल्ला शिवसेना प्रवक्त्या दीपाली सय्यद यांनी राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांना दिला आहे. दीपाली सय्यद कल्याण पूर्वेत खडेगोळवली येथे माजी महापौर रमेश जाधव यांच्या कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हा सल्ला दिला आहे.
मतपत्रिका इतरांना दाखवल्याचा आरोप करत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड , आमदार सुहास कांदे आणि राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुर यांची मतं अवैध करण्याची मागणी भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. यावर शिवसेना प्रवक्ता दीपाली सय्यद यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना खोचक सल्ला दिला आहे.
दीपाली सय्यद म्हणाल्या की, "जे काही होणार आहे ते कायद्याप्रमाणे होणार आहे. मात्र मी आव्हाड साहेबांना इतकंच सांगेन की राजकारणात डावपेच असतात ते शिकून येणं गरजेचं आहे. नक्की काय खरं आहे, काय खोटं आहे हे त्यानांच ठाऊक. पण जर अशा पद्धतीने काही झालं असेल तर आव्हाड साहेबांनी सांभाळून चाललं पाहिजे. काही नियम असतात त्याच्यामुळे आपल्याला काही परिणाम होवू नये, कारण आता जे राजकारण आहे ते सूडबुद्धीच राजकारण आहे, सूडाचं राजकरण आहे. त्यापासून आपण सांभाळून चाललं पाहिजे."
धर्मावर भाष्य करणे योग्य नाही
भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या आक्षपार्ह वक्तव्याबाबत बोलताना दीपाली सय्यद म्हणाल्या की, "भाजपने ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे, सोशल मीडियाचा ज्या पद्धतीने वापर केला जातोय ते चुकीचा आहे. प्रवक्त्यांच काम आपल्या पक्षाची बाजू ठेवणं असतं. मात्र त्याचा अर्थ असा नाही की कोणत्या धर्मावर टीका करणे. हे योग्य नाही. महाराष्ट्रात विरोधी पक्षातील प्रवक्ते अशा पद्धतीने वक्तव्यं करतात, हे कुठे ना कुठे सगळं थांबलं पाहिजे. आपण समाजाला, लहान मुलांना काय देतोय हे या लोकांना कळलं पाहिजे."
राज्यातला निकाल रखडला
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान झाले. मतदानानंतर सांयकाळी सहाच्या दरम्यान निकाल लागणे अपेक्षित होते. परंतु महाविकास आघाडीची तीन मतं अवैध ठरवावीत अशी भाजपने केलेल्या तक्रारीची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली. भाजपने राज्यसभेच्या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांचे मत बाद करावे अशी मागणी भाजपने केली होती. त्यानंतर अपक्ष आमदार रवी राणा आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतांवर काँग्रेसने आक्षेत घेतला. या संपूर्ण गोंधळात पाच तासांपासून निकाल रखडला आहे.