लग्नात एकत्र भेटले पण BMC निवडणुकीपूर्वी 'राजकीय लग्न' लागणार? दोन्ही ठाकरेंच्या कुंडलीतील राजकीय ग्रह बदलणार?
Raj Thackeray Uddhav Thackeray Meet : आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मराठी- हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज आणि उद्धव ठाकरेंचे 36 गुण जुळणार का हे पाहावं लागेल.
मुंबई : विधानसभेचा निकाल लागल्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, या जुन्या चर्चेला आता नव्यानं सुरुवात झाली. एका लग्नात हे दोन भाऊ एकत्र आले आणि त्यांनी एकमेकांशी गप्पाही मारल्या. महाराष्ट्रातली बदलती राजकीय समीकरणं आणि दोन्ही ठाकरेंची राजकीय गरज पाहता आता पुन्हा एकदा 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' सुरु होणार का, याची चर्चा सुरु झालीय.
गेली 18 वर्षे उद्धव ठाकरेंपासून राजकीयदृष्ट्या दूर-दूर जाणारे राज ठाकरे आज 'उद्धव ठाकरेंच्या दिशेनं' पावलं टाकताना दिसले. चालत चालत ते उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचले आणि तिथंच थांबले. हातात अक्षता घेऊन तयार असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी डाव्या हातात अक्षता जपून ठेवल्या आणि उजवा हाताने राज ठाकरेंना शेकहँड केला.
दोन्हीकडचे कुटुंबीयही एकमेकांशी गप्पागोष्टी करण्यात रमून गेले. निमित्त होतं राज ठाकरेंचा भाचा यश आणि रिआ यांच्या लग्नाचं. पण खरी चर्चा रंगली राज आणि उद्धव ठाकरेंच्या राजकीय पुनर्विवाहाची.
आतापर्यंत टाळी वाजलीच नाही
आतापर्यंत अनेकदा राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा झडल्या. अनेकांनी दोघांचे हात 'पॉलिटिकली पिले' करण्याचा प्रयत्न केला, पण काही केल्या टाळी काही वाजलीच नाही. लांडगा आला रे आला या गोष्टीप्रमाणं अजून तरी हे प्रत्यक्षात घडलेलं नाही. काहींनी या राजकीय लग्नाची आशा सोडली, तर काहींना ही शक्यता गृहितही धरावीशी वाटत नाही. दोघांचं एकत्र येणं हे लग्नापुरतंच मर्यादित राहिल असं महायुतीच्या नेत्यांचा अंदाज आहे. अर्थात त्यांचा अंदाज आणि अपेक्षा यात फारसा फरक नसणारच.
यावर शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, राज आणि उद्धव लग्नात भेटले तर वातावरण तापण्याची गरज नाही. राज ठाकरे यांनी अनेकदा टाळी देण्याचा प्रयत्न केला, पण उद्धव ठाकरे यांनी हात मागे घेतला. त्यामुळे दोघेही आता एकत्र येण्याची शक्यता नाही.
राज आणि उद्धव एकत्र येणं ही काही वर्षांपूर्वी अनेकांना अशक्यप्राय गोष्ट वाटत होती. मात्र महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत झालेल्या आणि मोडलेल्या युत्या आणि आघाड्या पाहता दोन ठाकरे एकत्र येणं ही अनेकांना राजकीय गरज वाटू लागली आहे. शिवाय बदलत्या राजकीय परिस्थितीत दोघांच्या कुंडलीतले राजकीय गुणदेखील जुळू लागल्याचं चित्र आहे.
राजकीय लग्नासाठी जुळणारे गुण
- विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरेंना फटका बसला.
- राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकेमुळं मनसेला मिळणारा व्होट शेअरही घटल्याचं दिसलं.
- आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक ही दोन्ही ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे.
- महायुतीला साथ देण्याचा राज ठाकरेंना कुठलाही विशेष फायदा झालेला नाही.
- विधानसभा निवडणुकांनंतर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मार्गाने जाण्याचे इरादे उघडपणे दाखवून दिलेत.
दोन्ही ठाकरे एकाच 'पॉलिटिकल लाईन'वर
विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरेंनी घेतलेली पहिलीच पत्रकार परिषद ही फक्त आणि फक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावर होती. गेल्या तीन वर्षांपासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भर देणारे राज ठाकरे आणि पुन्हा एकदा 'बॅक टू बेसिक' येत हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे वेगाने चाललेले उद्धव ठाकरे हे एकाच ' पॉलिटिकल लाईन'वर पोहोचल्याचं चित्र आहे. त्यामुळे मराठी माणसाची मुंबई वाचवण्यासाठी या दोघांनी एकत्र यावं, अशी भावना दोन्हीकडचे कार्यकर्ते व्यक्त करतायत.
उद्धव आणि राज ठाकरे लग्नात भेटणं हे तर केवळ चर्चेचं निमित्त झालं. मात्र राजकीय मंडपात हे दोघं खरंच एकत्र आले तर मुंबई महापालिका निवडणुकीतली गणितं नक्कीच बदलणार आहेत.
राज आणि उद्धव या दोन मामांच्या आशीर्वादानं यश आणि रिआ यांचा नवा संसार सुरु झाला. रिआ या शब्दाचा अर्थ 'नदीचा प्रवाह' असा असल्याचं गुगल सांगतं. आगामी निवडणुकीत मतांचं 'यश' मिळवण्यासाठी राज आणि उद्धव हे दोन 'प्रवाह' एकत्र येणार का आणि बीएमसी जिंकण्याच्या गुलाबी स्वप्नासाठी नवा संसार सुरु करणार का याचीच काय ती उत्सुकता.