राहुल गांधींचा मुंबई दौरा; शिवाजी पार्कवरील सभेसाठी काँग्रेसची हायकोर्टात धाव; आज याचिकेवर सुनावणी
Rahul Gandhi Mumbai Tour : राहुल गांधी यांच्या शिवाजीपार्क येथील सभेला अजूनही राज्य सरकारकडून काँग्रेसला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद आलेला नाही.
Rahul Gandhi Mumbai Tour : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर काँग्रेसचं मिशन मुंबई सुरु होत आहे. 28 डिंसेबरला काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मात्र राहुल गांधीच्या सभेवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. काँग्रेसकडून राहुल गांधींच्या सभेला परवानगी मिळवण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
राहुल गांधी यांच्या शिवाजीपार्क येथील सभेला अजूनही राज्य सरकारकडून काँग्रेसला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद आलेला नाही. त्यामुळे काँग्रेसकडून राहुल गांधींच्या सभेला परवानगी मिळावी यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. आज (मंगळवारी) या याचिकेवर तातडीची सुनावणी होणार आहे.
येत्या 28 डिसेंबरला कॉंग्रेस स्थापना दिवशी पहिल्यांदाच राहुल गांधी शिवतीर्थावर म्हणजेच, शिवाजी पार्कवर (Shivaji Park, Dadar) सभा घेणार आहेत. शिवाजी पार्कवर होणारी ही काँग्रेसची पहिली सभा नसली तरी राहुल गांधींची मात्र पहिलीच सभा आहे. यापूर्वी 2003 आणि 2006 मध्ये काँग्रेसची सभा सोनिया गांधींच्या नेतृत्वात झाली होती. त्यानंतर 2018 मध्ये राहुल गांधींच्या सभेकरता या मैदानावर सभा घेण्याची परवानगी मागितली गेली. मात्र, ती नाकारली गेली होती.
राज्यात कॉंग्रेस आणि सेनेची आघाडी असली तरी महापालिकेत बिघाडी आहे. मात्र, संजय राऊत आणि राहुल गांधींच्या भेटीनंतरची कॉंग्रेस-सेनेची वाढती जवळीक ही भाजपसोबतच राष्ट्रवादीचीही डोकेदुखी ठरेल. शिवतीर्थ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी पार्कच्या मैदानावर हिंदुत्वाच्या गर्जनाही घुमल्या आणि कॉमन मिनीमम प्रोग्रामवर आधारलेला महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी सोहळाही पार पडला. आता हेच मैदान कॉंग्रेसचं पुनरुज्जीवन पाहणार आहे. राहुल गांधींना बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यशैलीविषयी जाणून घेण्याची इच्छा असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊतांनी सांगितलं होतं. संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यात नवी दिल्लीत जवळपास सव्वा तास खलबतं झाली होती.
काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी शक्य नाही : संजय राऊत
काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यावेळी संजय राऊत यांनी भेटीदरम्यानच्या काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यावेळी राहुल गांधी म्हणाले होते की, "काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी शक्य नाही. विरोधकांची एकच युती व्हावी, त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत." पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, "तुम्ही पुढाकार घ्या, असे राहुलजींना सांगितले. आगामी निवडणुकांबाबतही चर्चा झाली. राष्ट्रीय राजकारणावर बोललो. टीएमसी आणि काँग्रेसला एकत्र आणण्यासाठी शरद पवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेते पुरेसे आहेत, असंही बोलणं झालं."
दरम्यान, एकीकडे काँग्रेस आणि तृणमूलमधला दुरावा वाढत असला तरी, शिवसेना-काँग्रेसमधील जवळीक वाढताना दिसतेय. शिवसेना खासदार संजय राऊतांनी काल राहुल गांधींची भेट घेतली, तर आज प्रियंका गांधींची भेट घेणार आहेत. 5 राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. त्यात यूपीएचं समर्थन केल्यानंतर या भेटींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. विशेषत: उत्तर प्रदेशात शिवसेना काँग्रेसला मदत करणार का? याबाबतही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह