Maharashtra Assembly Budget Session | कोरोनामुळे विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कार्यकाळाबाबत प्रश्न कायम
Maharashtra Assembly Budget Session : गेल्या वर्षीपासून मान्सून असो किंवा हिवाळी अधिवेशन त्याचे कामकाज दोन दिवस चालले होते. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन तरी पूर्ण काळ चालावे अशी विरोधकांची अपेक्षा आहे. पण कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या बघता आज तरी संसदीय कामकाज बैठकीत निर्णय झाला नाही.
मुंबई : एकीकडे राज्यात वाढणारे कोरोना रुग्ण आणि दुसरीकडे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन...हे नेमकं कसं पार पाडलं जाणार याचा निर्णय अजूनही झालेला नाही. नेहमी तीन आठवडे चालणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कार्यकाळ किती असेल याबाबत अजून प्रश्नचिन्ह कायम आहे.
एक वर्षांपूर्वी 2020 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आढळायला सुरुवात झाली. त्यामुळे तीन आठवडे चालणारे अधिवेशन लवकर गुंडाळावे लागले होते.
एक वर्षाने महाराष्ट्रात दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी व्हायला सुरुवात झाली. लसीकरणाचा कार्यक्रम देखील सुरु झाला. असं असलं तरी राज्यात विशेषतः विदर्भात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.
महाविकास आघाडी सरकार आपला दुसरा अर्थसंकल्प यावेळी मांडणार आहे. गेल्या वर्षीपासून मान्सून असो किंवा हिवाळी अधिवेशन त्याचे कामकाज दोन दिवस चालले होते. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन तरी पूर्ण काळ चालावे अशी विरोधकांची अपेक्षा आहे. पण कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या बघता आज तरी संसदीय कामकाज बैठकीत निर्णय झाला नाही.
विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी सरकारचा प्लॅन; तर घाबरट सरकार, फडणवीसांची टीका
आज 1 ते 8 तारखेपर्यंतचे कामकाज ठरवण्यात आलेलं आहे. राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन अधिवेशनाचा कालावधी ठरवण्यासाठी पुन्हा 25 फेब्रुवारीला बैठक होणार आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन हे यावेळी अतिशय महत्वाचे असणार आहे. अर्थसंकल्पावरील चर्चा ते राज्यातील विविध प्रश्न मांडण्याची संधी एक वर्षाने आमदारांना मिळणार आहे. पण अधिवेशनात मोठ्या प्रमाणावर शासन आणि प्रशासन कामाला जुंपल असतं. अशावेळी कोरोनाची बाधा होऊ नये याची जास्त खबरदारी सरकारला घ्यावी लागणार आहे.