विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी सरकारचा प्लॅन; तर घाबरट सरकार, फडणवीसांची टीका
विरोधक आक्रमक असताना विधानसभा अध्यक्ष निवडीवेळी दगाफटका होऊ नये म्हणून ठाकरे सरकारने आतापासूनच मास्टर प्लॅन आखला आहे.
मुंबई : नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर 1 मार्चपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अध्यक्ष निवडीसाठी ठाकरे सरकारची कसोटी लागणार आहे. आधीच विरोधक आक्रमक असताना अध्यक्ष निवडीवेळी दगाफटका होऊ नये म्हणून ठाकरे सरकारने आतापासूनच मास्टर प्लॅन आखला आहे. हा मास्टर प्लॅन आखण्यापूर्वी ठाकरे सरकारने बड्या वकिलाचे सल्ले घेतल्याची माहिती मिळत असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हा प्लॅन तयार केला आहे.
काय आहे ठाकरे सरकारचा मास्टर प्लॅन? विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी गुप्त मतदान केले जाते. मात्र गुप्त मतदानामध्ये गडबड होऊ नये म्हणून ठाकरे सरकारने काळजी घेतली असून, कोरोना काळात मतदान न घेता पहिल्याच दिवशी आवाजी मतदानावर अध्यक्षपदाचा तिढा सोडवायचा असा विचार ठाकरे सरकारचा आहे. किंवा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशन पुढे घेऊन जायचे आणि शेवटी अध्यक्ष निवडून आणायचा विचार ठाकरे सरकारचा आहे.
फडणवीसांची सरकारवर टीका बहुमत असताना घाबरणारं सरकार मी कधीच पाहिलं नसल्याची बोचरी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. जे सरकारमध्ये एवढं बहुमत असताना घाबरण्याचा प्रश्नच काय? असा सवाल देखील फडणवीसांनी उपस्थित केला. सरकारवर विरोधी पक्षाचा दबाव असल्याचं स्पष्ट दिसत आहे आमचंही मनोरंजन होत आहे आमदारांचं भलं होईल असा इशारा द्यायला फडणवीस विसरले नाहीत
विधानसभा अध्यक्षपदी कोण? नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी निवड झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष कोण होणार याची चर्चा रंगली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये संग्राम थोपटे, सुरेश वरपूडकर आणि अमीन पटेल यांच्या नावाची चर्चा आहे.
संग्राम थोपटे भोर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते यावेळी तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. सुरेश वरपूडकर हे पाथरीमधून निवडून आले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून 1998 मध्ये कृषी राज्यमंत्री म्हणून काम केलं आहे. ते परभणी लोकसभा मतदारसंघामधून 98-99 मध्ये खासदारही होते. अमीन पटेल यांनी हे मुंबईतील आमदार असून ही त्यांची तिसरी टर्म आहे. मुंबादेवी मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं आहे.