(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माझगाव येथील प्रिन्स अली खान रुग्णालय तात्पुरते बंद, मुंबई महानगरपालिकेला स्ट्रक्चरल ऑडिटनंतर रुग्णालय प्रशासनाचं पत्र
मुंबईतल्या माझगावमधलं प्रिन्स अली खान रुग्णालय आता तात्पुरतं बंद होणार आहे. प्रिन्स अली खान रुग्णालयाची 77 वर्षे जुनी इमारत धोकादायक असल्याचा अहवाल रुग्णालय व्यवस्थापनानं मुंबई महापालिकेकडे सादर केला आहे
मुंबई : मुंबईतल्या माझगाव येथील प्रिन्स अली खान रुग्णालयाची (Prince Ali Khan Hospital) मुख्य इमारत धोकादायक स्थितीत असल्याचं स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये आढळून आलं आहे. या रुग्णालयाच्या व्यवस्थापनानं करून घेतलेल्या स्वतंत्र स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये (Structural Audit) मुख्य इमारत असुरक्षित असल्याचं आढळून आलं. त्यामुळं हे रुग्णालय तात्पुरतं बंद करण्याचा निर्णय रुग्णालय व्यवस्थापनानं घेतला होता. पण त्या निर्णयाला राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. रुग्णालयाची जागा खासगी विकासकाच्या खिशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांच्याकडून करण्यात आला आहे.
मुंबईतल्या माझगावमधलं प्रिन्स अली खान रुग्णालय आता तात्पुरतं बंद होणार आहे. प्रिन्स अली खान रुग्णालयाची 77 वर्षे जुनी इमारत धोकादायक असल्याचा अहवाल रुग्णालय व्यवस्थापनानं मुंबई महापालिकेकडे (Mumbai Municipal Corporation) सादर केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या रुग्णालयातल्या रुग्णांचे प्रवेश आणि त्यांच्या शस्त्रक्रिया बंद करण्याचाही निर्णय व्यवस्थापनाकडून घेण्यात आला आहे. पण प्रिन्स अली खान रुग्णालयाच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीसोबत वंचित आघाडीकडूनही प्रिन्स अली खान रुग्णालय तात्पुरतं बंद करण्यासाठी विरोध नोंदवण्यात आलाय. यासंदर्भात पर्याय काढून मार्ग काढावा अशी वंचितची मागणी आहे. प्रिन्स अली खान रुग्णालयाच्या एक्स-रे कक्षात नुकतीच पडझड झाली होती. त्यामुळं व्यवस्थापनानं मुंबई महापालिकेशी सल्लामसलत करून रुग्णालयाच्या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलं. त्यात या इमारतीला सी-1 श्रेणीमध्ये ठेवण्यात आलंय. त्यामुळं रुग्ण आणि कर्मचार्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन रुग्णालय तात्पुरतं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
माझगाव येथील प्रिन्स अली खान हे खाजगी रुग्णालय 1945 मध्ये सुरू करण्यात आले होते. जुन्या इमारतीत 150 खाटांचे रुग्णालय असून दरवर्षी साधारण दीड लाख बाह्यरुग्ण व नऊ हजार आंतररुग्णांवर उपचार करण्यात येतात. रुग्णालयात सध्या जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना जवळच्या रुग्णालतात हलवण्यात येणार आहे. प्रिन्स अली खान रुग्णालय अचानक बंद झाल्यास त्याचा मोठा फटका रुग्णालय कर्मचाऱ्यांना बसणार आहे. त्यामुळं कर्मचारी संभ्रमात आहेत. रुग्णालय तात्पुरतं बंद न करता त्याची डागडुजी करून ते सुरु ठेवण्याची मागणी जोर धरू लागलीय.