(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी; ठाणे महापालिका रुग्णालयाचे 100 बेड 'चाईल्ड कोरोना' म्हणून आरक्षित
ठाणे पालिकेच्या हद्दीत असलेले पार्किंग प्लाझा रुग्णालयात 100 सुसज्ज बेड हे 'चाईल्ड कोरोना' म्हणून आरक्षित करण्यात येणार आहेत. मुलांच्या देखभालीसाठी कुटुंबीयांतील एक व्यक्ती सोबत राहण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
ठाणे : ठाण्यात दुसऱ्या लाटेचा जबरदस्त तडाखा बसला. यात काही लहान मुलांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता आणि त्याचा फटका लहान मुलांना बसणार असल्याने प्रसंगावधान म्हणून ठाणे पालिकेच्या हद्दीत असलेले पार्किंग प्लाझा रुग्णालयात 100 सुसज्ज बेड हे 'चाईल्ड कोरोना' म्हणून आरक्षित करण्यात येणार आहेत. त्यामुळे मुलांच्या कोरोना उपचारात मोठी मदत होणार आहे.
तिसऱ्या लाटेत मुलांना कोरोनाची बाधा झाल्यास सरसकट मुलांवर उपचार केल्यास मुलांसाठी ते धोकादायक राहणार आहे. 100 बेड रुग्णालयात अलिप्त ठेवल्यास मुलांच्या देखभालीसाठी कुटुंबीयांतील एक व्यक्ती सोबत राहण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. त्यामुळे मुलांच्या उपचारासाठी तैनात असलेल्या कर्मचारी यांचा ताण कमी होईल आणि मुले लवकर कोरोना मुक्त होतील, असे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले आहे. असे असले तरी ठाण्यात लसीकरणवर ब्रेक लागला आहे. कारण लसींचा शून्य साठा उपलब्ध आहे, केंद्राने याची दखल घ्यावी आणि महाराष्ट्राला लस द्यावी असेही महापौर यांनी म्हटले आहे.
पंढरपुरातही कोरोनाबाधित मुलांसाठी कोविड रुग्णालय सुरु होणार
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात नवजात बालके आणि लहान मुलांमध्ये कोरोनाचे संक्रमण आढळू लागल्याने अशा बालकांवर उपचारासाठी पहिले कोविड हॉस्पिटल पंढरपूरमध्ये सुरु होणार आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी डॉक्टर शीतल शहा यांच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक निर्णय देण्याची भूमिका घेतल्याने आता अशा लहान चिमुरड्यांचा प्रश्न सुटणार आहे.
राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्स तयार करणार
कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्स तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत असून तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करण्यात येणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही सांगितलं. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला जात आहे. अशातच तिसऱ्या लाटेची देखील पूर्वसूचना मिळाली आहे. हो धोका लक्षात घेऊन त्याच्या प्रतिबंधासाठी शासनाने पावले उचलली आहेत.