MLC Election 2022 : हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीसाठी दरेकर, महाजन लोकलने विरारला!
MLC Election 2022 : बहुजन विकास आघाडीच्या तीन मतांसाठी सर्वपक्षीय नेत्यांची हितेंद्र ठाकूर यांच्याकडे येरझाऱ्या सुरु आहेत. ठाकूर यांच्या भेटीसाठी प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन मुंबईवरुन लोकल ट्रेनने विरारला रवाना झाले.
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी एक एक मत मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून आपापल्या पक्षांसह अपक्ष आणि लहान पक्षांवर डोळा आहे. 20 तारखेला होणाऱ्या विधानपरिषदेच्या 10 जागांच्या निवडणुकीसाठी भाजपकडून 5 तर महाविकास आघाडीकडून 6 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी दोन्ही बाजूंचे प्रयत्न सुरु आहेत. भाजप नेते प्रवीण दरेकर आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आज लोकल रेल्वेने प्रवास केला. बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीसाठी दोन्ही नेते मुंबईवरुन लोकल रेल्वेने विरारला रवाना झाले. दुपारी 3.30 वाजता ते हितेंद्र ठाकूर यांची विवा कॉलेज विरार इथे भेट घेणार आहेत.
हितेंद्र ठाकूर यांच्या बविआची तीन मतं आहेत. या तिन्ही मतांवर महाविकास आघाडी आणि भाजपचा डोळा आहे. त्यामुळेच दोन्ही बाजूंकडून हितेंद्र ठाकूर यांना गळ घातली जात आहे. आधी काँग्रेसकडून भाई जगताप, राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी भेट घेतली होती. त्यानंतर आता भाजप नेतेही हितेंद्र ठाकूर यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी विरारवारी करत आहेत.
राज्यसभा निवडणुकीतही ठाकूर यांची मनधरणी
या आधी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी हितेंद्र ठाकूर यांच्या घरी सर्व पक्षीय नेत्यांनी येरझाऱ्या मारल्या. त्यावेळी जिंकून येणाऱ्या उमेदवाराला आपण मतदान केल्याचं ठाकूर यांनी सांगितलं होतं.
हितेंद्र ठाकूर यांचे सर्वपक्षीय संबंध
बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांचे सर्वपक्षीयांशी उत्तम संबंध आहेत. ते जितके पवारांच्या जवळचे आहेत तितकेच उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि भाजपच्याही जवळचे आहेत. त्यामुळे त्यांचं मत कुणाकडे जाणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
बहुजन विकास आघाडीकडे हितेंद्र ठाकूर, क्षीतिज ठाकूर आणि राजेश पाटील अशी तीन मते आहेत. या तीन मतांसाठी हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा सुरु आहे. या तीन आमदारांची मते निर्णायक ठरणार आहेत. हितेंद्र ठाकूर राज्यसभा निवडणुकीप्रमाणे आपले पत्ते लपवून ठेवणार की उघड करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.