(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सरनाईक पितापुत्र ईडीसमोर आज हजर राहणार
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग आज सकाळी 11 वाजता चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहणार आहेत. 24 नोव्हेंबरला प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीनं छापा टाकला होता. टॉप्स ग्रुपमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याप्रकरणात ईडीनं चौकशी सुरु केली आहे.
मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग आज सकाळी 11 वाजता चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहणार आहेत. काही वेळात ते ईडी कार्यालयात पोहोचण्याची शक्यता आहे. 24 नोव्हेंबरला प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीनं छापा टाकला होता. टॉप्स ग्रुपमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याप्रकरणात ईडीनं चौकशी सुरु केली आहे. त्यादिवशी ईडीनं प्रताप सरनाईक यांचा मोठा मुलगा विहंगला ताब्यात घेऊन 5 तास चौकशी केली. त्यानंतर विहंगला दुसऱ्या दिवशी चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.
मात्र विहंगनं पत्नीची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगून चौकशीला हजर राहण्यास नकार दिला. त्यानंतर ईडीनं आणखी एक समन्स बजावलं मात्र त्यानं पुढची वेळ मागितली. दरम्यान प्रताप सरनाईक 24 तारखेलाच परदेशातून परत आले. त्यांना 25 ला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं. मात्र त्यांनी आपण नियमाप्रमाणं क्वारंटाईन होत असल्याचं सांगितलं. तो 5 दिवसांचा कालावधी संपून 10 दिवस उलटून गेलेत.
दरम्यान टॉप्स ग्रुप प्रकरणात ईडीनं सरनाईक यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अमित चांदोळे यांची 12 तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडी दिली, ती ईडी कोठडीत बदलण्यासाठी ईडीनं कोर्टात धाव घेतली आहे.
मंगळवारी प्रताप सरनाईक यांनी थेट सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन आपल्यावरची ईडा-पिडा टळो अशी प्रार्थना केली. तसंच आपण चौकशीला सामोरे जाऊ पण केंद्रासमोर झुकणार नाही असं म्हटलं आहे. दरम्यान प्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला होता. तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे ईडीला निर्देश दिले आहेत. ईडीच्या कारवाईविरोधात सरनाईकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. अन्य एका प्रकरणासोबत सरनाईकांचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे तूर्तास कारवाई न करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.