'बेस्ट' सेवेसाठी मुंबईत आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे हाल, जेवणातही अळ्या; रस्त्यावर उतरत कर्मचाऱ्यांचं आंदोलन
मुंबईत बेस्ट सेवेसाठी दाखल झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांची सोय गोरेगाव येथील हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. पण हे हॉटेल क्वॉरंटाईन सेंटर असून हॉटेलमधील खोल्यांची स्वच्छता केलेली नाही. तसेच जेवणंही निकृष्ट दर्जाचं मिळत असल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी हॉटेलबाहेर आंदोलन केलं.
!['बेस्ट' सेवेसाठी मुंबईत आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे हाल, जेवणातही अळ्या; रस्त्यावर उतरत कर्मचाऱ्यांचं आंदोलन poor quality food serving for st employees who work in mumbai during covid-19 plandemic Employees protest outside Hotel Royal Palm 'बेस्ट' सेवेसाठी मुंबईत आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे हाल, जेवणातही अळ्या; रस्त्यावर उतरत कर्मचाऱ्यांचं आंदोलन](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/02140541/ST-Employees-Protest01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीतील रॉयल पाम या हॉटेलमध्ये मुंबईत बेस्ट सेवेसाठी दाखल झालेल्या 500 एसटी कर्मचाऱ्यांची सोय करण्यात आली होती. पण हे हॉटेल आधी क्वॉरंटाईन सेंटर असून या हॉटेलमधील खोल्यांची साफसफाई देखील झालेली नाही. त्यामुळे रात्री हॉटेलबाहेर येत एसटी चालक आणि वाहकांनी आंदोलन केलं. गेल्या आठवड्यात याच हॉटेलमध्ये राहून घरी परतलेल्या सांगलीतील 100 हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आधीच भीतीचं वातावरण आहे. म्हणून आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत. हॉटेल चालक आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये मध्यस्थी केली. हॉटेल स्वच्छ करुन एसटी कर्मचाऱ्यांना उत्तम अन्न देण्याचे हॉटेल व्यवस्थापकांना आदेश दिले.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे मुंबई लोकल सेवा बंद करण्यात आली होती. अनलॉक प्रक्रियेत सर्व पूर्ववर्त करण्यासाठी बेस्ट सेवा सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली. परंतु, लोकल सेवा बंद असल्यामुळे बेस्ट सेवेवर संपूर्ण ताण पडत होता. त्यामुळे राज्यांतील प्रमुख एसटी बस डेपोमधून काही बसेस या मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. या सर्व बसेससोबत एसटी कर्मचारीही मुंबईत दाखल झाले आहेत. या कर्मचाऱ्यांची सोय अगदी उत्तम केल्याचा दावा सातत्यानं एसटी प्रशासन करत आहे. परंतु, राहण्याची आणि खाण्याची सोय योग्य नसल्याचे आरोप वारंवार एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहेत.
मुंबईत सेवेसाठी दाखल झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांची सोय आरे कॉलनीतील हॉटेल रॉयल पाममध्ये करण्यात आली आहे. परंतु, हे हॉटेल आधी क्वॉरंटाइन सेंटर होतं. या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना क्वॉरंटाईन केलं जात होतं. परंतु, त्यानंतर या हॉटेलची स्वच्छता नीट करण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीच हॉटेलबाहेर येत आंदोलनाला सुरुवात केली.
पाहा व्हिडीओ : BEST सेवेसाठी बोलावलेल्या 350 एसटी कर्मचाऱ्यांच्या जेवणात अळ्या,रस्त्यावर उतरत कर्मचाऱ्यांचं आंदोलन
दरम्यान, गेल्या आठवड्यात याच हॉटेलमध्ये राहून घरी परतलेल्या सांगलीतील 100 हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. हे चालक घरी परतल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांची दुसरी तुकडी मुंबईत सेवेसाठी दाखल झाली. हे कर्मचारीही सातत्यानं एसटी प्रशासनावर आरोप करत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा देखील निकृष्ठ असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. कर्मचाऱ्यांना जेवणासाठी आणलेला भात योग्य नसल्याचं या व्हिडीओत उपस्थित कर्मचारी सांगत आहेत. हा भात शिळा असून त्याला वास येत असल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे. असं अन्न खाऊन आम्ही आजारी पडायचं का? असा संतप्त सवालही या व्हिडीओत उपस्थित कर्मचारी विचारत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)