Mansukh Hiren case | मनसुख हिरण प्रकरणावरुन आशिष शेलार यांचे गंभीर आरोप
मनसुख हिरण प्रकरणातील शवविच्छेदन अहवालात छेडछाड होत असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केलाय.
मुंबई : राज्य सरकार दिवसेंदिवस अडचणीत येत असल्याचे पहायला मिळत आहे. आधी संजय राठोड प्रकरण आणि आता मनसुख हिरण यांच्या संशयास्पद मृत्यू. अशातच भाजप नेते आशिष शेलार यांनी गंभीर आरोप केले आहेत. संजय राठोड प्रकरणातील ज्या ऑडिओ क्लिप सांताक्रुज इथल्या फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये छेडछाड करण्यात येते की काय? तसेच मनसुख हिरण यांचे शवविच्छेदन अहवालात ही छेडछाड केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने या पुराव्यांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी करा, अशी मागणी शेलार यांनी आज केलीय.
आमदार शेलार म्हणाले की, रोज नवीन हेराफेरी या ठाकरे सरकारच्या काळात सुरू आहे. एका गुन्ह्याला लपवण्यासाठी दुसरा गुन्हा केला जातोय. एका तरुणीच्या आत्महत्या, हत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजिनामा घेण्यात आला. त्यानंतर सचिन वाझे प्रकरण उघड झाले. त्याचा फायदा घेत राठोड प्रकरणातील ऑडिओ क्लीप ज्या सांताक्रूझ इथल्या फाँरेन्सीक लॅबमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये छेडछाड सुरु आहे की काय? तो आवाज संजय राठोड यांचा नाहीच असे अहवाल तयार होण्यासाठी पोलीस यंत्रणेमार्फत छेडछाड होण्याची शक्यता असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय.
सचिन वाझे प्रकरणामुळे सरकार अस्थिर झालं यात तथ्य नाही, सरकार पडणे शक्य नाही : संजय राऊत
स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी व्हावी : शेलार
तसेच मनसुख हिरण यांचा शवविच्छेदन अहवाल तसे शवविच्छेदन करतानाचे रेकॉर्डिंग पोलिसांना पुर्णपणे देण्यात आलेले नाही. त्यामध्ये सुध्दा छेडछाड केली जाते आहे की काय? अशी शंका शेलार यांनी उपस्थित केली. त्यामुळे या सगळ्या प्रकरणी स्वतंत्र यंत्रणेमार्फत या पुराव्यांची तपासणी होण्याची गरज आहे असे आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे.