Narendra Modi : राज्याला मिळणार दोन नव्या वंदे भारत ट्रेन.. मुंबईहून सोलापूर आणि शिर्डीसाठी आलीशान गाड्या, सोलापूरचं तिकीट रु. 2200 फक्त तर शिर्डीसाठी रु.1800
Narendra Modi : शुक्रवार, 10 फेब्रुवारीपासून राज्यात मुंबई- सोलापूर (Mumbai - Solapur) आणि मुंबई - साईनगर शिर्डी (Mumbai Sai Nagar Shirdi) या दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध विकासकामाचं उद्घाटन करणार आहेत. त्याशिवाय वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदीलही दाखवणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर ते मुंबई आणि मुंबई ते साईनगर शिर्डी अशा दोन वंदे भारत एक्सप्रेस 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. 10 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी या दोन्ही गाड्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. 10 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता हा सोहळा सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे देखील या सोहळ्यासा उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रात सुरु होणाऱ्या या वंदे भारत एक्स्प्रेस ही 9 वी आणि 10 वी गाडी असणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या या उद्घाटन समारंभाला राज्यातील काही निवडक विद्यार्थ्यांना रेल्वेतर्फे निमंत्रण देखील देण्यात येणार आहे. रेल्वेच्या संदर्भातील विषयांवर केंद्रीय विद्यालय तसेच राज्यातील शाळांमध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या विद्यार्थ्यांना वंदे भारत एक्सप्रेस चा प्रवास करता येणार आहे. मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी जाणाऱ्या या गाड्यांचा ज्या ज्या स्थानकावर थांबा असेल तिथे स्वागताची तयारी देखील सुरु आहे. उद्घाटन झाल्यानंतर लगेच नियमित सेवा सुरु होणार आहे का? या बाबत अद्याप अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
वंदे भारत एक्सप्रेस नियमित सुरु झाल्यानंतर सोलापुरातून ही रेल्वे सकाळी सहा वाजता निघणार आहे. मुंबईत पोहोचायला जवळपास साडेसहा तास या गाडीला लागणार असून दुपारी 12.30 च्या सुमारास तिथे पोहोचेल. तसेच मुंबईतून दुपारी 4.30 च्या सुमारास ही गाडी सोलापूरच्या दिशेने रवाना होईल. सोलापुरात रात्री 10.40 वाजता ही गाडी पोहोचेल. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र वेळे संदर्भात अद्याप कोणाताही अधिकृत माहिती रेल्वेकडून जारी करण्यात आलेली नाही.
सोलापूर ते मुंबई हे अंतर रेल्वेने 455 किमी इतके आहे. एक्सप्रेस गाडीला या प्रवासासाठी साधारण साडे आठ तास लागतात. मात्र वंदे भारत एक्सप्रेस साडे सहा तासात हा प्रवास पूर्ण करण्याची शक्यता आहे. सोलापूर, (Solapur) कुर्डूवाडी, (Kurduwadi Junction) पुणे, (Pune) लोणावळा, (Lonavala) ठाणे, (Thane) दादर, (Dadar) हे थांबे या गाडीला असणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर चेअर कार साठी 900-1100 रुपये आणि एक्सिक्युटिव्ह क्लाससाठी 1900-2200 रुपये इतके शुल्क असण्याची शक्यता आहे. या शुल्कात प्रवाशांना आरामदायी प्रवाशासह नाश्ता, पाणी बॉटल देखील मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई - साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी सकाळी 6.15 वाजता शिर्डीच्या दिशेने निघेल आणि दुपारी 12.10 वाजता शिर्डीत पोहोचेल. तर साईनगर शिर्डीवरुन वंदे भारत एक्सप्रेस संध्याकाळी 5.25 च्या सुमारास मुंबईच्या दिशेने रवाना होईल. तर रात्री 11.18 वाजता ही गाडी मुंबईत दाखल होईल. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र अद्यात वेळे संदर्भात कोणाताही अधिकृत अध्यादेश रेल्वेतर्फे निघालेला नाही.
साईनगर शिर्डी ते मुंबई हे अंतर 385 किमी इतके आहे. एक्सप्रेस गाडीला हा प्रवास करण्यासाठी साधारण 6 तास लागतात. मात्र वंदे भारत एक्सप्रेस साडे पाच तासात हे अंतर पूर्ण करेल. साईनगर शिर्डी, नाशिक, ठाणे, दादर, मुंबई हे या गाडीचे थांबे असण्याची शक्यता आहे. चेअर कारसाठी 800 ते 1000 आणि एक्सिक्युटिव्ह क्लाससाठी 1600 ते 1800 रुपये दर असण्याची शक्यता आहे. मात्र स्थानिक रेल्वे प्रशासनाला अधिकृत कोणतीही माहिती या संदर्भात केंद्रीय रेल्वे विभागाकडून आलेली नाही.