कुत्र्याच्या धक्क्याने प्लायवूडचा ढिगारा कोसळून 2 बहिणींचा मृत्यू, ठाण्यातील घटना
घटनेप्रकरणी डायघर पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान नेहमी गोदामात आग लागल्याच्या घटनांनी गाजलेला शिळफाटा परिसरातील या दुर्दैवी घटनेने मात्र परिसरात शोककळा पसरली आहे.
ठाणे : मुंब्राजवळील डायघर येथे दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घरात असलेल्या कुत्र्याचा लाकडाच्या प्लायच्या ढिगाऱ्याला धक्का लागल्याने तो ढिगारा कोसळून या बहिणींवर पडला. या घटनेत या दोन्ही बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद डायघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिळफाटा परिसरात चौरसिया कुटुंबाचे वास्तव्य आहे. घराच्या बाजूलाच त्यांचे प्लायवूडचे गोदाम आहे. रविवारी रात्री चौरसिया कुटुंब घरात जेवत होते. त्यावेळी घरात मच्छर चावत असल्याने 12 वर्षीय अंजु आणि 9 वर्षीय संजू या दोघी घराच्या बाजूलाच असलेल्या प्लायवूडच्या गोदामात झोपण्यासाठी गेल्या. त्याच गोदामात प्लायवूडच्या ढिगाऱ्यावर त्यांचा पाळीव कुत्रा बसलेला होता. गोदामात अंजु आणि संजू आल्याने कुत्र्याने केलेल्या हालचालीने प्लायवूडचा ढिगारा कोसळला आणि तो गोदामात असलेल्या अंजु आणि संजूच्या अंगावर पडला.
प्लायवूडच्या ढिगाऱ्याखाली दोघी सापडल्याने दोघींच्या डोक्याला आणि इतर ठिकाणी जबर मार लागल्याने गंभीर अवस्थेत त्यांना कळव्यांच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी घटनास्थळी आलेले डायघर पोलीस ठाण्याचे अधिकारी घोसाळकर यांनी डायघर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद केली.
या घटनेमुळे चौरसिया कुटुंबाला मोठा धक्का बसला असून पाळीव कुत्र्याचा प्रताप चौरसिया कुटुंबाला खूपच महागात पडला आहे. त्यांच्या दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी डायघर पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान नेहमी गोदामात आग लागल्याच्या घटनांनी गाजलेला शिळफाटा परिसरातील या दुर्दैवी घटनेने मात्र परिसरात शोककळा पसरली आहे.