एक्स्प्लोर
पेट्रोल-डिझेलचे दर हलक्या पावलांनी सत्तरी पार
1 जुलैपासून इंधनांचे दर दररोज बदलण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे गेल्या 60 दिवसातील 50 दिवसात इंधनाच्या किंमती वाढतच गेल्याचे निदर्शनास आले आहे.
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलण्यास सुरुवात झाल्यापासून वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे हे कुणाच्याच लक्षात येत नसल्याने याबाबत कुठेही बोललं जात नाही. दिल्लीत पेट्रोलच्या दरांमध्ये गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक वाढ झाली, तर मुंबईतही पेट्रोलच्या दरांनी 78 चा टप्पा पार केला आहे.
1 जुलैपासून इंधनांचे दर दररोज बदलण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे गेल्या 60 दिवसातील 50 दिवसात इंधनाच्या किंमती वाढतच गेल्याचे निदर्शनास आले आहे.
दररोज दर ठरवण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीपासून आतापर्यंत पेट्रोलचे दर 6 रुपयांनी, तर डिझेलचे दर 4 रुपयांनी वाढले आहेत. देशभरातील शहरांनुसार हा आकडा एक-दोन रुपयांनी कमी-जास्त होईल. मात्र, वाढ सगळीकडे झाल्याचे समोर आले आहे. पेट्रोल-डिझेलच्या या दरांमध्ये रोज चढ-उतार होत असल्याने ग्राहकांच्या सहसा लक्षात येत नाही. त्यामुळे ग्राहकांच्या कोणत्याही संघटनांनी अद्याप यावर आवाज उठवलेला नाही.
दिल्लीत विक्रमी वाढ
दिल्लीत रविवारी पेट्रोलच्या दरांनी 73.06 रुपये दराची विक्रमी नोंद केली. गेल्या तीन वर्षात दिल्लीतील पेट्रोलचे हे दर सर्वाधिक आहेत. डिझेलचे दरही यात मागे नाहीत. दिल्लीत डिझेलच्या दरांनी रविवारी 61.90 रुपयांची नोंद केली.
मुंबईतही पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ!
दिल्लीसह मुंबई, हैदराबाद यांसारख्या मोठ्या शहरांमध्येही पेट्रोल-डिझेलच्या दरांची सारखीच स्थिती आहे. मुंबईत आज (28 ऑगस्ट) पेट्रोलचे दर 78.22 रुपये एवढे, तर डिझेलचे दर 60.57 रुपये एवढे आहेत. मुंबईतही गेल्या दोन महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दर कायम वाढतच गेल्याचे दिसून येते. कधी 10, तर कधी 20 पैशांनी होणारी वाढ पटकन कुणाच्या लक्षात येत नाही. मुंबईत पैशा-पैशांनी वाढ झाल्याची गेल्या दोन महिन्यातील आकडेवारी लक्षात घेता दिसून येते.
दरांमध्ये रोज बदल
इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या महत्वाच्या कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनाच्या व्यवहारात जास्त पारदर्शकता यावी आणि दरातील चढ-उताराचा ग्राहाकांना फटका बसू नये, हा यामागे उद्देश आहे. 1 जुलैपासून पेट्रोल-डझेलचे दररोज दर बदलण्यास सुरुवात झाली आहे.
पाच शहरात प्रयोग, नंतर देशभरात अंमलबजावणी
त्याआधी 1 मे पासून उदयपूर, जमशेदपूर, पद्दुचेरी, चंदीगढ आणि विशाखापट्टणम या पाच शहरांत ऑईल कंपन्यांकडून दररोज किंमती बदलण्याचा प्रयोग केला गेला. त्यानंतर 1 जुलैपासून देशभरात अंमलबजावणी केली गेली.
15 वर्षांची दर व्यवस्था बंद
2002 सालापासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमधील चढ-उतार प्रत्येक महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला म्हणजेच दर 15 दिवसांनी जाहीर होत असे. मात्र, 1 जुलैपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांची ही 15 वर्षे जुनी व्यवस्था बंद करुन दररोज दर ठरवण्यास सुरुवात झाली.
विशेष म्हणजे अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर दररोज ठरवण्याची व्यवस्था अगोदरपासूनच सुरु आहे.
संबंधित बातमी : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर आता दररोज बदलणार!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement