Petrol Diesel Price : पेट्रोलच्या किमतीने गाठली शंभरी; ठाण्यात राष्ट्रवादीची बॅनरबाजी
Petrol Diesel Price : देशात पेट्रोल आणि डीझेलच्या किमतींमध्ये या महिन्यातील 4 तारखेनंतर आज चौदावी दरवाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. ठाणे- मुंबईत पेट्रोलनं शंभरी गाठली आहे. डीझेलची किंमत 29 पैसे प्रति लिटर वाढ झाली आहे. याचाच निषेध करण्यासाठी ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बॅनर लावण्यात आलेला आहे.
ठाणे : एकीकडे कोरोनामुळे नागरिक हैराण झाले असतानाच दुसरीकडे पेट्रोलच्या दरवाढीमुळे देखील आता सर्व नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. याचाच निषेध करण्यासाठी ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बॅनर लावण्यात आलेला आहे. पेट्रोलच्या किमती या प्रति लिटरसाठी शंभर रुपये पोहोचल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने हरिनिवास सर्कल इथे एक बॅनर लावून त्यावर पांढऱ्या दाढीमध्ये एक क्रिकेटपटू दाखवला आहे. या क्रिकेटपटूच्या खाली त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन त्यांचा गौरव देखील करण्यात आलेला आहे. तसेच अच्छे दिनाच्या शुभेच्छा असे लिहिण्यात आले आहे. या बॅनरमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
देशात पेट्रोल आणि डीझेलच्या किमतींमध्ये या महिन्यातील 4 तारखेनंतर आज चौदावी दरवाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. ठाणे- मुंबईत पेट्रोलनं शंभरी गाठली आहे. डीझेलची किंमत 29 पैसे प्रति लिटर वाढ झाली आहे. ठाणे- मुंबईत पेट्रोल आज 100.4 रुपये आणि डिझेल 91.87 रुपये प्रति लिटर आहे. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हे फलक लावले आहेत. ठाणे शहरात लावण्यात आलेल्या या फलकावर दाढीवाल्या फलंदाजाचे चित्र असून त्याने शतक पूर्ण केल्याचे नमूद केले आहे. "मॅन ऑफ दि मॅच; पेट्रोल 100 नॉट आऊट; अच्छे दिनाच्या शुभेच्छा" असा संदेशही या फलकांवर लावण्यात आला आहे. या फलकांची ठाणे शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले की, "गेले काही दिवस सातत्याने इंधनाचे दर वाढत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसने या दरवाढीचा निषेध करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरात फलक लावले आहेत. सत्तेवर येण्यापूर्वी नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते "बहुत हुई महँगाई की मार, अब की बार मोदी सरकार" असे ओरडत होते. मात्र, आता त्यांच्या कार्यकाळात महागाईचा उच्चांक झाला आहे. यूपीएच्या काळात पट्रोल-डिझेल कधीच एवढ महाग झाले नव्हते. त्यामुळेच केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हे फलक लावले आहेत."
महत्त्वाच्या इतर बातम्या :