(Source: Poll of Polls)
बिल गेट्ससह पुनावाला यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका, कोविड लसीच्या दुष्परिणामामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप
याचिकेत एक हजार कोटींची नुकसानभरपाई देण्याची मागणी मुलीच्या वडिलांनी केली असून गुगल, युट्यूब, मेटा यांनी खरी माहिती दडवल्यानं त्यांच्यावरही कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
मुंंबई : मुलीचा कोरोना लसीच्या दुष्परिणामामुळे मृत्यू झाल्याचा दावा करत एका व्यक्तीनं 1 हजार कोटींच्या नुकसानभरपाईचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. लस बनवणाऱ्या कंपन्यांनी तसेच सरकारनंही ही लस सुरक्षित असल्याचा दावा केला होता. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लसी घेतली आणि वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या मुलीचा मृत्यू झाला असा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या याचिकेत केंद्र सरकार, राज्य सरकार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांसोबतच सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला आणि सिरमचे भागीदार बिल गेट्स यांनाही प्रतिवादी करण्यात आलं आहे. याशिवाय तसेच गुगल, यूट्युब, मेटा सारख्या सोशल मीडिया लसीच्या दुष्परिणामांमुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत योग्य डेटा दडपण्याच्या कटात सहभागी असल्यामुळे केंद्र सरकारनं त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी, अशी मागणीही या याचिकेतून केलेली आहे.
दिलीप लुणावत असं या याचिकाकर्त्यांचे नाव असून त्यांची मुलगी स्नेहल लुणावत नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी येथील धामणगावच्या दंत महाविद्यालयात वरिष्ठ प्राध्यापक आणि डॉक्टर म्हणून कार्यरत होती. ती आरोग्य सेविका असल्यानं तिला कोरोना प्रतिबंधक लस आधीच घेण्यास सांगितलं होतं. त्यानुसार तिनं 28 जानेवारी 2021 रोजी कोविडशिल्ड ही लस घेतली. मात्र, लस घेतल्यानंतर तिचा 1 मार्च 2021 रोजी मृत्यू झाला. कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दुष्परिणामांमुळेच आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा करत स्हेनलच्या वडिलांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एआयआयएमएस) च्या संचालकांनी केलेल्या दाव्यांनुसार, कोरोना प्रतिबंधित लसी या संपूर्णतः सुरक्षित असल्याचं म्हटलं होतं. मात्र, त्यांनी केलेल्या खोट्या आणि चुकीच्या दाव्यांमुळेच आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा लुणावत यंनी याचिकेत केला आहे. तसेच केंद्र सरकारच्या एइएफआय या समितीने 2 ऑक्टोबर 2021 रोजी आपल्या मुलीचा कोविल्डशिल्ड लसीच्या दुष्परिणामांमुळे मृत्यू झाल्याचं मान्य केल्याचंही त्यांनी या याचिकेत नमूद केलं आहे. त्यामुळे आपल्या मुलीला न्याय मिळावा आणि इतर लोकांचेही प्राण वाचावेत म्हणून आपण ही याचिका दाखल करत असल्याचं लुणावत यांनी म्हटलं आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा-
- काही लग्नगाठी स्वर्गात नाही तर नरकात बांधल्या जातात, पती-पत्नीच्या कौटुंबिक हिंसाचारावर मुंबई उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे
- न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न करणाऱ्यांची यापुढे खैर नाही! मुंबई उच्च न्यायालयाचे खडेबोल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha