पालघरमध्ये गाव खेड्यातील गरोदर माता आणि रुग्णांची रस्त्यांअभावी उपचारासाठी परवड, झोळीचा आधार घेण्याची वेळ
जव्हार मोखाडा विक्रमगड या भागात बालमृत्यू आणि माता मृत्यूंचे प्रमाणही जास्त आहे मात्र या सगळ्याकडे प्रशासन आणि सरकार लक्ष कधी देणार असा सवाल उपस्थित केला जातोय.
पालघर : बुलेट ट्रेन, मुंबई बडोदा द्रुतगती महामार्ग, वाढवण बंदर असे देशातील सर्वात मोठे प्रकल्प ज्या पालघरमध्ये प्रस्तावित आहेत त्याच पालघरमध्ये गाव-पाड्यांना जोडणारे रस्ते नसल्याने येथील प्रसूतीसाठी वेदना होणार्या महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी खांद्यावरील डोलीचा आधार घ्यावा लागत असल्याच भीषण वास्तव समोर आल आहे. जव्हार तालुक्यातील झाप मनमोहाडी येथील गर्भवती महिलेला अचानक प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. गावापर्यंत रस्ता नसल्याने कुटुंबासह गावकऱ्यांची ही तारांबळ उडाली. मनमोहाडी गाव आणि मुख्य रस्ता यांच्यामध्ये सहा ते सात किलोमीटर अंतर असून हा संपूर्ण भाग डोंगराळ आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी गर्भवती महिलेला चादरीच्या डोलीत घेऊन हा डोंगर पार केला. देश डिजिटल इंडिया कडे वाटचाल करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र मुंबई लगत असलेल्या पालघर मध्ये अजूनही अनेक गावांना जोडणारे रस्ते ही नाहीत. त्यामुळे वेळीच उपचार न मिळाल्याने येथील अनेक रुग्णांचा मृत्यू झालाय. जव्हार मोखाडा विक्रमगड या भागात बालमृत्यू आणि माता मृत्यूंचे प्रमाणही जास्त आहे मात्र या सगळ्याकडे प्रशासन आणि सरकार लक्ष कधी देणार असा सवाल उपस्थित केला जातोय.
जव्हार तालुक्यातील झाप मनमोहाडी गावातील गरोदर महिलेला 8 ऑगस्ट रोजी दवाखान्यात जातांना सकाळी 9 वाजेच्या सुमारास अचानक कळा येऊ लागल्याने, त्या कुटुंबाची धावपळ उडाली. त्यानंतर ग्रामस्थांनी त्या गरोदर मातेलाझोळीत बांधून जवळपास 7 ते 8 किमी डोंगर चढून पायी प्रवास करत झाप येथील आरोग्य सबसेंटर येथे त्या गरोदर मातेला प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु त्या आरोग्य सबसेंटर पुरेशा सुविधा अभावी जव्हार जव्हार येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायात झाप पैकी मनमोहाडी येथे तीन पांडे असून, जवळपास एकूण कुटुंब 252 कुटुंब राहत आहेत. परंतु स्वातंत्र्यपासून या गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने, आजही येथील रुग्ण, गरोदर माता आणि नागरिकांना पायी प्रवास करून तालुक्याचे ठिकाणी पोहचावे लागत आहे. अनेक वर्षांपासून रस्त्याची मागणी आहे, मात्र या भागातील संबंधित शासकीय यंत्रणा विकासाच्या बाबतीत निद्रावस्थेत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होतोय.
ज्या मनमोहाडी गावात गावात रस्ताच नाही, त्या गावात अॅम्बुलन्स येणार तरी कुठून? मात्र येथील ग्रामस्थ अॅम्बुलन्सची वाट न पाहता पिढ्यांपिढ्या रुग्णांना, गरोदर महिलेला दवाखान्यात पोहचवण्यासाठी झोळीचा आधार आहे. पुन्हा एकदा ऐन पावसाळ्यात घडलेली घटना दोनच दिवसापूर्वी एका गरोदर मातेला झोळीने बांधून दवाखान्यात पोहचवावे लागले.
मनमोहाडी गावातील गरोदर माता, महिलेची प्रक्षुतीची वेळ तारीख जवळ आली की कुटुंबाची धावपळ होण्याआधी, गरोदर महिला तालुक्याच्या ठिकाणी नातेवाईकांकडे येऊन थांबावे लागते.
सरकारची वाट न पाहता ग्रामस्थांकडून रस्त्याचे काम
पावसामुळे डोंगर दरीतील दगडांचा डोंगराळ रस्त्याची झाडे दगड पडून पायवाट झाली होती. कच्च्या रस्त्यावर पावसामुळे दगड माती पडली होती, पायी चालण्याचा रस्ता तुटून गेला होता, आणि त्यामुळे बस किंवा खाजगी जीप गाठण्यासाठी झाप येथे पायी चढावे लागते. मात्र या वर्षीच्या पावसात रस्ताच धुवून गेल्याने त्या मनमोहाडी भागातील नागरिकांना साधे पायी चढणेही कठीण झाले होते. मात्र सरकारची वाट न पहाता त्या गावातील नागरिकांनी एकत्र येऊन श्रमदानातून रस्त्याचे काम करून त्यांनी आपला रस्ता मोकळा करून घेतला.
जोपर्यंत रस्ता होत नाही, तोपर्यंत आम्ही कायम प्रयत्नशील आहोत. अनेक वेळा शासनाकडे पत्रव्यवहार केले आहेत. परंतु आमच्या भागातील गरोदर माता व रुग्णांचे हाल संपणार तरी कधी? असा सवाल बहुजन विकास आघाडी जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी उपस्थित केला.