![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
दीर्घकाळानंतर परमबीर सिंह-सचिन वाझे एकमेकांसमोर, काही सेकंदांचा संवाद, पण काय?
Parambir Singh and Sachin Vaze Meet : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्यात काही सेकंदांसाठी संवाद.
![दीर्घकाळानंतर परमबीर सिंह-सचिन वाझे एकमेकांसमोर, काही सेकंदांचा संवाद, पण काय? Parambir Singh and Sachin Vaze Meet After long time Parambir Singh Sachin Vaze face to face for few seconds दीर्घकाळानंतर परमबीर सिंह-सचिन वाझे एकमेकांसमोर, काही सेकंदांचा संवाद, पण काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/07/3a43c52158e70177a348ce7890d06e68_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Parambir Singh and Sachin Vaze Meet : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चांदीवाल आयोगासमोर हजर झालेत. चांदीवाल आयोगासमोर जाताना मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे (Sachin Vaze) एकमेकांसमोर आले. त्यावेळी दोघांमध्ये काही सेकंदांसाठी संवाद झाला. पण यावेळी दोघांमध्ये काय बोलणं झालं ते कळू शकलेलं नाही. तरी, चांदीवाल आयोगासमोर गैरहजर राहिल्यानं याआधी दोनदा बजावलेलं जामीनपात्र वॉरंट आता रद्द करण्यात आलं आहे.
चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चांदीवाल आयोगासमोर हजर झाले होते. यावेळी चांदीवाल आयोगानं परमबीर सिंहांना बजावलेलं जामीनपात्र वॉरंट रद्द केलं आहे. परंतु, आयोगासमोर हजर राहण्यापूर्वी परमबीर सिंह आणि सचिन वाझे एकमेकांसमोर आले होते. त्यावेळी या दोघांमध्ये काही सेकंदांसाठी संवादही झाला. पण त्यांच्यात नेमकं काय बोलणं झालं ते कळू शकलं नाही. काही दिवसांपूर्वी उद्योजक मुकेश अंबानींच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटकं आढळली होती. तेव्हापासून राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झालेच, पण या प्रकरणानं वेगळं वळणंही घेतलं. याचप्रकरणी सचिन वाझेंना अटक करण्यात आली आहे. सचिन वाझेंच्या अटकेनंतर पहिल्यांदाज परमबीर सिंह आणि सचिन वाझे एकमेकांसमोर आले. त्यामुळे काही सेकंदांच्या भेटीत या दोघांमध्ये काय बोलणं झालं? याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत.
परमबीर सिंह चांदीवाल आयोगासमोर हजर
परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर टाकलेल्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली होती. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालं होतं. अशातच परमबीर सिंह यांच्या चौकशीसाठी चांदीवाल आयोगाची स्थापना झाली होती. त्यानंतर बराच काळ परमबीर सिंह बेपत्ता होते. किला कोर्टानं त्यांना फरारही घोषित केलं होतं. अशातच चांदीवाल आयोगानं चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावलं होतं. परंतु, परमबीर सिंह चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. त्यावेळी चांदीवाल आयोगानं त्यांना दोन वेळा जामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. ते आज आयोगानं रद्द केलं आहे.
परमबीर सिंहांची आता सीआयडी चौकशी
मुंबईत दाखल झाल्यानंतर चौकशीसाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात हजेरी लावणाऱ्या परमबीर सिंह (Parambir Singh)यांना आता सीआयडी (CID) चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती आहे. येत्या सोमवारी आणि मंगळवारी सीआयडी परमबीर सिंह यांची चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सीआयडीकडून दोन गुन्ह्यात परमबीर सिंग यांना समन्स बजावलं असल्याची माहिती सूत्रांची माहिती आहे. सोमवारी आणि मंगळवारी दोन दिवशी चौकशीला हजर राहण्याचं समन्स त्यांना पाठवलं आहे. मरीन ड्राईव्हमधील श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीनुसार दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना समन्स देऊन चौकशीला सोमवारी बोलावण्यात आलंय. ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात परमबीर सिंग यांना मंगळवारी हजर राहण्यासाठी समन्स देण्यात आलं असल्याची माहिती आहे. ठाण्यातील बाजारपेठ पोलीस ठाण्यातून सीआयडीला वर्ग झालेल्या भीमराव घाडगे यांच्या तक्रारीचा अट्रोसिटीच्या गुन्ह्यात परमबीर यांचा जून महिन्यात जबाब सीआयडीने नोंदवला आहे. अट्रोसिटी गुन्ह्यात चंदीगढला जाऊन परमबीर यांचा जबाब सीआयडीकडून नोंदवण्यात आला असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)