पाक हा विश्वासघातकीच,ट्रम्पला विचारायला हवं, तात्या तुम्ही हे काय केलं? अरविंद सावंतांचा पाकिस्ताकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन होताच सवाल
Arvind Sawant on Donald Trump : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश शस्त्रसंधी करण्यासाठी तयार असल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. मात्र, पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे.

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुपारी शस्त्रसंधीसंदर्भात सहमती झाली होती. पाकिस्तानच्या डीजीएमओनं भारताच्या डीजीएमओला फोन करुन शस्त्रसंधीसाठी विनंती केली होती. त्यानंतर दोन्ही देशांनी शस्त्रसंधी करत असल्याचं म्हटलं होतं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार झाल्याची सर्वात अगोदर घोषणा केली होती. शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर अवघ्या तीन तासात पाकिस्ताननं पुन्हा एकदा खरा रंग दाखवत ड्रोन हल्ले करण्यास सुरुवात केली. एक प्रकारे पाकिस्ताननं डोनाल्ड ट्रम्प यांना तोंडावर पाडलं आहे. पाकिस्ताननं डोनाल्ड ट्रम्प यांचा विश्वासघात करताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारला आहे.
अरविंद सावंत म्हणाले की,पाक हा विश्वासघातकीच आहे पण आता ट्रम्पला विचारायला हवं, तात्या तुम्ही हे काय केलं? तुमचं सांगून भारताने ऐकलं पाकिस्तानने तुमचं ऐकलं नाही का?
अरविंद सावंत पुढं म्हणाले की, IMF चे 1.3 लाख दशलक्ष डॉलर्स कर्ज उपलब्ध करून दिलं.... ही मस्ती आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर याची नोंद घेतली पाहिजे, अशी मागणी देखील सावंत यांनी केली आहे.
भारतानं पाकव्याप काश्मीर ताब्यात घ्यावं : अरविंद सावंत
भारत मजबूत आहे.पाकिस्तानला जर एवढी खुमखुमी आहे तर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतलं पाहिजे. पैसे मिळेपर्यंत पाकिस्तान दुपारी साडे तीन पर्यंत हो म्हणाले...पैसे आल्यावरती पुन्हा हल्ला सुरू केला,हा ट्रम्पचा देखील अपमान आहे, त्यांच्या उत्तराची अपेक्षा आहे, असं अरविंद सावंत म्हणाले.
शस्त्रसंधी संदर्भात लेखी करार झाला का?नेमकं साडे तीन वाजता काय घडलं? आपण देश म्हणून एक आहोत. पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे, असं देखील अरविंद सावंत म्हणाले.
पाकिस्तानसारखा कुरापतखोर देश सुधारणार नाही: रोहित पवार
युद्धबंदी होऊन तीन तास उलटत नाहीत तोच पाकिस्तानने ड्रोनहल्ले करत पुन्हा एकदा कुरापत काढली आहे. पाकिस्तानसारखा कुरापतखोर देश कधीही सुधारणार नाही, असं आमदार रोहित पवार म्हणाले आहेत. पाकिस्तानला अद्दल घडवायची असेल तर 1971 मध्ये ज्याप्रमाणे स्व. इंदिरा गांधीनी आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता कणखर भूमिका घेत पाकिस्तानचे दोन तुकडे केले त्याचप्रकारे बलुचिस्तानला स्वतंत्र करत सध्याच्या पाकचे आणखी दोन तुकडे करण्याची आज गरज आहे.सेना सज्ज आहे, सेनेवर देशाचा विश्वास आहे, सरकारने निर्णय घ्यावा, संपूर्ण देश आणि सर्व राजकीय पक्ष सरकारसोबत आहेत, असंही रोहित पवार म्हणाले.























