मुंबईत उद्यापर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होईल : महापौर किशोरी पेडणेकर
महापालिका रुग्णालयातील रुग्णांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. लिक्विड आॅक्सिजनचा पुरवठा उद्या दुपारपर्यंत पूर्ववत करण्यात येणार असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे.
मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या संपूर्ण देशात वाढली असून त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्याची गरज मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तसेच मुंबईतील ऑक्सिजनचा जो तुटवडा झाला आहे तो उद्यापर्यंत सुरळीत होईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
रूग्णांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही : किशोरी पेडणेकर
ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या चारही व्हेंडरशी बोललो. पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्रांकडून काल ऑक्सिजनच्या तुटवड्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. यासंदर्भात पुरवठा पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ऑक्सिजनची कमतरता मुंबईतील चारही रुग्णालयातील रुग्णांना जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. असं जरी असलं तरी, महापालिका रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न आहे. कुर्ला भाभा रुग्णालयाला 70 सिलेंडर आणि भाभा रुग्णालयाला 40 सिलेंडर दिले आहेत. शताब्दीला 6 सिलेंडर, अग्रवाल रुग्णालयाला 25, ट्रॉमा केअरला 8 सिलेंडर देण्यात आले आहेत. तसेच या रुग्णालयासोबतच इतर रुग्णालयांना देखील मागणीनुसार पुरवठा केला जाईल. रूग्णांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, असे पेडणेकर म्हणाल्या.
टॅंकरमधून येणारा ऑक्सिजन दोन दिवसात सर्व पूर्ववत होईल. सध्या बाटला ऑक्सिजनवर रुग्णांना प्राणवायू पुरवठा सुरु आहे. खासगी रुग्णालयातील रुग्णांना ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे जबरदस्तीने डिस्चार्ज देण्यात येत आहे. यासंदर्भात बोलताना महापालिका रुग्णालयातील रुग्णांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. लिक्विड आॅक्सिजनचा पुरवठा उद्या दुपारपर्यंत पूर्ववत करण्यात येणार असल्याचे पेडणेकर यांनी सांगितलं आहे.
लसीचा पुरवठा जलदगतीनं व्हावा : किशोरी पेडणेकर
लसीकरण संदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, केंद्राकडून जशी लस येत आहे तशी आपण देत आहे. लसीकरणासाठी केंद्राकडे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आयुक्त मागणी करत आहे. लसींना मागणी असून पुरवठा जलदगतीनं झाला पाहिजे.
नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे : किशोरी पेडणेकर
आजपासून(18 एप्रिल) मुंबईत खासगी वाहनांसाठी कलरकोड सिस्टम लागू करण्यात आले आहे. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे पोलिसांनी उचललेलं पाऊल चांगलं आहे. नागरिकांनी छोट्या-छोट्या कारणासाठी लाख मोलाचा जीव धोक्यात घालू नये. वाहनांसाठी कलरकोडची कल्पना चांगली आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
रेमडेसिवीर प्रकरणावरुन महापौरांचा भाजपवर निशाणा
सध्या जे काही सुरू आहे ते नागरिक बघत आहे आणि आपलं मत बनवत आहे. कोण किती कळकळीने काम करत आहे आणि कोण किती कळीने काम करत आहे हे सर्वांना दिसत आहे, असा टोला पेडणेकर यांनी भाजपला दिला आहे. महाराष्ट्राची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे महाराष्ट्र हा फोकस असला पाहिजे. जर औषध आणायचंच आहे तर सरकारला विश्वासात घेत आणायला पाहिजे होती. संपूर्ण मुंबईकर बघतं आहे ती कोण कशा पद्धतीनं आणि कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे? असा प्रश्न उपस्थित करत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. जो सत्तेत असतो त्याची कुटुंब प्रमुखाप्रमाणे वागणूक असायला हवी आणि जरी विरोधी पक्षात असला तरी सख्ख्या चुलत भावाप्रमाणे त्याचेही वागणे असले पाहिजे. श्रेय लाटण्यासाठी जर मुंबईकरांना वाचवण्याचं असं म्हणत असतील तर मुंबईकर म्हणतील "आमचं जे काही आमचं व्हायचं ते होऊ दे", असेही पेडणेकर म्हणाल्या.