आरक्षणासाठी मराठा संघटनांकडून पंढरपूर ते मंत्रालय पायी दिंडीचे आयोजन
मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने पंढरपूर ते मंत्रालय पायी दिंडीचे आयोजन करण्यात येणार आहे. लाखो मराठा बांधव सहभागी होणार असल्याचा विश्वास, आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कमी पडत असल्याचा आरोप करत आता मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चा यांनी पायी दिंडीचे आयोजन केले आहे. पंढरपूर ते मंत्रालय जवळपास 360 किलोमीटरचं अंतर पार करून ही दिंडी मुंबईत दाखल होणार आहे. 7 नोव्हेंबरला सुरु होणारी ही दिंडी 27 नोव्हेंबरला मुंबईत पोहचण्याची शक्यता आहे.
या दिंडीत लाखो मराठा समाज बांधव सहभागी होणार असल्याची शक्यता मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे. आज मुंबईतील मुंबई मराठी पत्रकार संघ येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली. यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य उपस्थित होते. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही अशी घोषणा आंदोलकांनी केली आहे.
पुण्यातील मराठा आरक्षण परिषद रद्द; उदयनराजेंकडून आमंत्रितांना बैठक रद्दचा निरोप
याबाबत बोलताना मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळून आता जवळपास दोन महिने उलटले आहेत. परंतु, अद्याप आरक्षणाबाबत कोणताही आवश्यक तो निर्णय घेण्यात आलेला नाही. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे आपली बाजू मांडण्यासाठी विनंती अर्ज सादर करणे गरजेचं होतं. परंतु, सरकारने याबाबत जाणूनबुजून उशीर केला आणि त्यामुळे पुन्हा एकदा चार आठवड्यांची मुदतवाढ सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे आमचं स्पष्ट मत आहे की, सरकार जाणूनबुजून आरक्षणाच्या प्रश्नांबाबत उशीर करत आहे.
हीच बाब लक्षात घेत आता आम्ही आत्तापर्यंत खूप आंदोलनं केली आहेत. परंतु, 7 नोव्हेंबरला जे आंदोलन करणार आहोत हे मात्र वेगळ्या पद्धतीचं असणार आहे. आम्ही 7 नोव्हेंबरला पंढरपूर येथे विठूरायचं दर्शन घेऊन आमच्या दिंडी आक्रोश मोर्चाला सुरुवात करत आहोत. या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकार दरबारी आमचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये मराठा आरक्षण, सध्या जी मेगाभरती जाहीर केली आहे ती रद्द करावी, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा द्यावी हे प्रश्न मांडणार आहोत.
Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी पंढरपूर ते मुंबई पायी दिंडी, स्थगिती उठवण्याची मागणी