मुंबईतील खासगी रुग्णालये लुटमारीची केंद्र, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांचा आरोप
कुर्ल्यातील कोहिनूर रुग्णालयात रामचंद्र दरेकर यांच्यावर गेल्या महिनाभरापासून उपचार सुरु होते. त्यांच्या निधनानंतर रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या कुटुंबियांना उपचारापोटी सुमारे 17 लाख रुपयांचे बिल दिले.

मुंबई : कोरोनाच्या नावाखाली अनेक खाजगी रुग्णालये लुटमारीची केंद्रे झाली आहेत, असा घणाघाती आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. या लुटमारीचा फटका दुसरं तिसरं कुणी नाही तर स्वतः दरेकर यांच्याच कुटुंबियांना बसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुर्ल्यातील कोहिनूर रुग्णालयात प्रविण दरेकर यांच्या काकांचा कोरोनाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. तरी तब्बल 17 लाखांचं बिल त्यांच्या कुटुंबियांना आकारण्यात आलं. हे कळताच प्रविण दरेकर यांनी भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, स्थानिक नगरसेवक हरीश भांडीर्गे आणि वरिष्ठ पोलीस निक्षसकांसह रुग्णालयात धाव घेतली आणि व्यवस्थापनाची झाडाझडती घेतली.
कुर्ल्यातील कोहिनूर रुग्णालयात रामचंद्र दरेकर यांच्यावर गेल्या महिनाभरापासून उपचार सुरु होते. त्यांच्या निधनानंतर रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या कुटुंबियांना उपचारापोटी सुमारे 17 लाख रुपयांचे बिल दिले. यापैकी 11 लाख रुपये संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी दिले असतानाही रुग्णालयाने उर्वरित पैशासाठी तगादा लावला होता. प्रविण दरेकर यांची आक्रमक भूमिका पाहून रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला असता आपणास संपूर्ण माहिती द्यावी, अन्यथा आपल्या विरोधात तक्रार केली जाईल, असा इशारा दरेकर यांनी दिला.
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या तपशिलामध्ये रुग्ण व त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी 31 दिवस पीपीई किटचे पैसे लावले. त्याचा खर्च सुमारे अडीच लाख रुपये आल्याचे प्रशासनाने सांगितले असता एका पीपीई किटची दरेकर यांनी किंमत विचारली. त्यावर प्रशासनाने एका किटसाठी 2700 रुपये बिल लावल्याचे सांगितले असता उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी खुल्या बाजारामध्ये पीपीई किट केवळ 300 ते 350 रुपयाला मिळते, असं सांगितले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने रुग्णावर झालेल्या खर्चाची माहिती देण्याचा प्रयत्न केला असता औषधे आणि इंजेक्शनचे बेसुमार बिल लावल्याचे उघडकीस आले. त्यामुळे रुग्णावर केवळ 2 ते 3 लाख रुपये खर्च झाला असावा, अशी शक्यता प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली. तर प्रत्यक्षात 9 पट बिल आकारल्याचं निदर्शनास आले. यापुढे गोर-गरीब रुग्णांना राज्य सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार करावा, तसेच महापालिकेने उपलब्ध केलेलले बेड देण्यात यावेत असे प्रशासनाला ठणकावून सांगितले.नियमांवर बोट ठेवतात पितळ उघड्या पडलेल्या रुग्णालय प्रशासनाने संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांना सहा लाख रुपये तात्काळ देण्याचे मान्य केले. तसेच भाजप मुंबई अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांनी कोहिनूरप्रमाणे मुंबईतील अनेक खाजगी रुग्णालये गरीब रुग्णांची लूटमार करत असल्याचे सांगितले. या सर्व रुग्णालयांविरोधात भाजपाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. रुग्णांच्या आर्थिक पिळवणुकीची सरकारने तपासणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

