केवायसीच्या नावाखाली फसवणूक, कॅन्सरग्रस्त मुलाच्या उपचारासाठी आलेल्या कुटुंबाला 90 हजारांचा गंडा
ऑनलाईन व्यवहारात गंडा घातला गेल्याचं हे काही पहिलं उदाहरण नाही. मात्र, ज्याच्या घरात 11 वर्षाच्या मुलाला रक्ताचा कॅन्सर झालाय. त्यानं स्वत:च्या रक्ताचं पाणी करुन जमवलेली रक्कम काही मिनीटांमध्ये लुटली गेली.
मुंबई : ऑनलाईन फसवणुकीची अनेक प्रकार मुंबईत समोर येत आहेत. प्रामुख्याने केवायसीबाबत विचारणा करुन बँक अकाऊंटची माहिती मिळवून लोकांची फसवणूक होत आहे. त्यामुळे तुम्हाला फोन करुन तुमचा केवायसी भरा नाहीतर तुमचं अकाउंट बंद होईल, असं कुणी सांगत असेल तर तुमची फसवणूक केली जाऊ शकते. लखनौहून मुंबईत मुलाच्या कँन्सरच्या उपचारासाठी आलेले संकेत कुमार वर्माही असेच फसवले गेले आहेत. त्यांच्या मुलाच्या उपचारासाठी मोठ्या मुश्कीलीने जमवलेले 90 हजार रुपये ते एका फोनवरच्या फसवणुकीमुळे गमावून बसले आहेत.
दादरच्या धर्मशाळेत सध्या कुटुंबासह राहणारे संकेत कुमार वर्मांवर आता आभाळ कोसळलं आहे. लखनौमध्ये व्यवसाय करुन कमावलेसे पैसे, सगळी पुंजी मुलगा आवेक वर्माच्या कॅन्सरच्या उपचारासाठी खर्ची घातली. 11 वर्षाच्या आवेगला रक्ताचा कॅन्सर झाला आहे. टाटा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी बरेच महिने मुंबईत ते राहिले. फोनवरुनच व्यवसायाची कामं सुरु केली. आवेगच्या उपचारासाठी बोन मँरो ट्रान्सप्लांट करणे गरजेचं होतं. त्यासाठी बँकेत 90 हजारांची रक्कम त्यांनी राखीवही ठेवली. आता सगळं काही सुरळीत होईल, असं वाटत असतानाच अचानक आलेल्या एका फोनने त्यांच्यावर संकट ओढावलं आहे.
संकेत वर्मा यांचे पैसे तीन टप्प्यात एसबीआय आणि आयसीसीआयसीआय बँकेच्या खात्यातून 90 हजार रुपये काढून घेण्यात आले. आपली फसवणूक होत असल्याचं वर्मा यांच्या उशीरा लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी बँकेशी संपर्क साधला. त्यावेळ अवैधरित्या हा व्यवहार झाल्याचं बँकेकडून त्यांना कळालं. त्यानंतर त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि याबाबत तक्रार दाखल केली आहे.
केवायसीच्या नावाखाली फसवणूक कशी होते?
- तुम्ही पेटीएम नियमीत वापरता, पण तुम्हाला तुमचा केवायसी अपडेट करावा लागेल नाहीतर अकाऊंट कायमचं बंद होईल, असं समोरुन सांगण्यात येतं.
- केवायसी भरण्यासाठी केवळ एक अॅप आहे. ते क्विक सपोर्ट अॅप डाऊनलोड करण्यास सांगतात.
- हे अॅप डाऊनलोड झाल्यानंतर तुमचा फोन हॅक केला जातो.
- तुम्हाला कोणताही पासवर्ड, ओटीपी, अकाऊंट नंबर विचारला जात नाही.
- तुमच्या पेटीएम अकाऊंटमध्ये काही पैसे भरण्यासही सांगितलं जातं. हे पैसे नंतर अनधिकृतरित्या तुमच्या अकाऊंटमधून काढून घेतले जातात.
- जेव्हा बँकेला आणि तुम्हाला या अवैधव्यवहाराची शंका येते तोपर्यंत तुमचं अकाऊंट रिकामं झालेलं असतं.
ऑनलाईन व्यवहारात गंडा घातला गेल्याचं हे काही पहिलं उदाहरण नाही. मात्र, ज्याच्या घरात 11 वर्षाच्या मुलाला रक्ताचा कॅन्सर झालाय. त्यानं स्वत:च्या रक्ताचं पाणी करुन जमवलेली रक्कम काही मिनीटांमध्ये लुटली गेली. आवेगच्या उपचारासाठी बोन मँरो ट्रान्सप्लांटसाठी 22 लाख 51 हजारांचा खर्च येणार आहे. मात्र जे आहे ते सुद्धा वर्मा कुटुंबाने गमावलं आहे. या फसवणुकीची तक्रार त्यांनी भोईवाडा पोलीस स्टशनला केली.