Traffic Police | ड्रिंक अँड ड्राइव्हची सर्वात मोठी कारवाई ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत
31 डिसेंबरला रात्रभर ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये झालेल्या कारवाईत 416 मद्यपी वाहनचालक पोलिसांना सापडले आहेत.
ठाणे : संपूर्ण महाराष्ट्रातून ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्वाधिक तळीरामांवर आणि सहप्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. नववर्षाचे स्वागत करताना मद्यप्राशन करून वाहन चालवण्याचे प्रकार रोखण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी आयुक्तालयाच्या हद्दित 54 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. त्यात 416 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या 207 सह प्रवाशांवरही दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहन चालकांच्या विरोधात 25 डिसेंबरपासून मोहीम सुरू केली आहे. 25 ते 31 डिसेंबर या कालावधीत झालेल्या कारवाईत एकूण 926 मद्यपी वाहनचालक पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत. तर त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या 451 जणांनाही कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागला आहे.
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदीचे आदेश दिले असले तरी नवीन वर्षांच्या स्वागतासाठी अनेक जण घराबाहेर पडण्याची शक्यता होती. मद्य प्राशन करून वाहन चालवल्याने अपघातांचे प्रमाणही वाढण्याची भीती होती. या संभाव्य दुर्घटना रोखण्यासाठी 31 तारखेला आयुक्तालयाच्या हद्दित ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. त्यात प्रत्येक वाहन चालकांची कसून चौकशी करण्यात आली. संशयास्पद वाहनचालकांची ब्रेथ अॅनालायझर्सच्या सहाय्याने तपासणी करण्यात आली. यावेळी कोरोनाचा धोका असल्याने वाहतूक पोलिसांनी पीपीई किट घातले होते तर ब्रेथ अनालायजरचे नोझल देखील प्रत्येक नागरिकासाठी वेगवेगळे वापरण्यात आले होते. त्यात वाहन चालकाने मद्य प्राशन केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मोटार वाहन कायद्याच्या कलम 185 अन्वये त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
31 डिसेंबरला रात्रभर ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये झालेल्या कारवाईत 416 मद्यपी वाहनचालक पोलिसांना सापडले आहेत. या वाहनचालकांसोबत प्रवास करणाऱ्यांना मोटर वाहन कायद्याच्या कलम 188 अन्वये दोषी ठरवून त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करता येते. त्यानुसार 207 सहप्रवाशांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.
नारपोली शाखेच्या हद्दित सर्वाधिक 67 वाहनचालक आणि 40 सहप्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याखालोखाल कोणगाव, डोंबिवली, उल्हासनगर या विभागांचा क्रमांक लागतो. सर्वात कमी मद्यपी वाहनचालक राबोडी, ठाणे नगर आणि कोपरी या विभागात आढळले आहेत. 31 डिसेंबरला सापडलेल्या तळीरामांकडून न्यायालयाने 12 लाख 46 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर 25 डिसेंबरपासून झालेल्या कारवाईत तब्बल 3 कोटी 94 लाखाहून जास्त दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.