राष्ट्रवादीचे मिशन घरवापसी; अजित पवार, जयंत पाटील यांच्यावर गयारामांना परत आणण्याची जबाबदारी
निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेल्यांना परत आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने व्यूहरचना आखली आहे. राष्ट्रवादी घरवापसी अभियान राबवणार आहे. गयारामांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्याची जबाबदारी अजित पवार, जयंत पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तसंच आमदारांना पक्षात घेताना शिवसेना आणि काँग्रेसला विश्वासात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस निर्णय घेणार आहे.
मुंबई : महाविकास आघाडी सरकार पडण्याचे नवे नवे मुहूर्त सांगितले जात असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस घरवापसी अभियान राबवणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थानसारख्या राज्यात भाजपने सत्ताधारी काँग्रेसचे आमदार फोडले तर महाराष्ट्रात निवडणुकी आधी भाजपमध्ये गेलेले आणि पस्तावलेल्या नेत्यांना राष्ट्रवादी पक्षात परत घेणार आहे.
2019 विधानसभा निवडणुकी आधी अनेक नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडली होती. विकासाची काम करण्यासाठी भाजपमध्ये जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आता महाविकास आघाडी सरकार आल्यावर या नेत्यांना परत यायचं आहे. अशा लोकांना परत आणण्याची जबाबदारी शरद पवार यांनी अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर सोपवली आहे.
शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. दोन दिवस आधीच मंत्री नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे सूतोवाच केले होते. त्यानंतर ही बैठक झाली.
महाविकास आघाडी सरकार असल्याने प्रत्येक जिल्ह्यातील तीनही पक्षाचं राजकारण, पक्षाची ताकद पाहून गेलेल्या नेत्यांना पुन्हा प्रवेश दिला जाणार आहे. आमदारांना घेताना शिवसेना आणि काँग्रेसला विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाणार आहे.
राष्ट्रवादीचे आमदार जाणार ही केवळ अफवा, उलट भाजपचे आमदारच राष्ट्रवादीत येण्यास आतुर : नवाब मलिक
याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले असता त्यांनी भाजपमध्ये गेलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी पक्षात परत यायचे आहे, ते संपर्कात असल्याचं स्पष्ट केलं. पण विद्यमान आमदारांना पक्षात घेणार का हा प्रश्न विचारला असता ज्यांचा निवडणुकीत पराभव झाला आमदार होऊ शकले नाहीत असे लोक संपर्क करत आहेत, त्यांच्याशी चर्चा सुरु असल्याचेही त्यांनी म्हटलं. ते आमदार नसल्याने त्यांना पक्षात परत घेण्यात महाविकास आघाडीतील इतर पक्षांना पण अडचणी नसतील असंही ते म्हणाले. मंत्री भुजबळ यांनी देखील राष्ट्रवादी पक्षात दुसऱ्या पक्षातील कुणी आमदार परत येणार असतील तर त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, असं म्हटलं. पण सरकारमध्ये तीन पक्ष एकत्र असल्याने परत निवडून येण्यात काही अडचण येणार नाही, असंही स्पष्ट केलं
भाजप नेते एकीकडे महाराष्ट्रात सरकार पडणार असा दावा करत असताना तसंच ऑपरेशन लोटसच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत असताना, भाजपला मेसेज देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस घरवापसी मिशन राबवणार आहे. राजस्थानमध्ये भाजपचे सत्ता स्थापनेचे प्रयोग अयशस्वी झाल्यावर महाराष्ट्रात तिन्हीही पक्ष सतर्क आहेत.
निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे कोणते बडे नेते भाजपमध्ये? उदयनराजे भोसले - सातारा शिवेंद्रराजे भोसले - सातारा राणाजगजितसिंह पाटील - उस्मानाबाद धनंजय महाडिक - कोल्हापूर बबनराव पाचपुते - श्रीगोंदा रणजितसिंह मोहिते-पाटील - माळशिरस मधुकर पिचड - अकोले गणेश नाईक - नवी मुंबई राष्ट्रवादीचे आमदार जाणार ही केवळ अफवा, उलट भाजपचे आमदारच राष्ट्रवादीत येण्यास आतुर : नवाब मलिक