Anil Deshmukh Case : अनिल देशमुखांना हायकोर्टाचा दिलासा; उद्याच कारागृहातून सुटका, जामिनाची स्थगिती वाढवण्याची CBI ची याचिका फेटाळली
Anil Deshmukh Case : अनिल देशमुखांना हायकोर्टाचा मोठा दिलासा. सीबीआयला मुदत वाढवून देण्यास हायकोर्टाचा नकार.
Anil Deshmukh Case : अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) हायकोर्टाचा (High Court) मोठा दिलासा मिळाला आहे. अनिल देशमुखांच्या जामीनाच्या (Anil Deshmukh Bail) स्थगितीला मुदत वाढवून देण्याच्या सीबीआयची मागणी हायकोर्टानं फेटाळली आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानं देशमुखांच्या जामीनाला दिलेली वाढीव स्थगिती आज संपणार आहे. याचसंदर्भात सीबीआयनं जामीनाला मुदतवाढ मिळण्यासाठी केलेल्या याचिकेसंदर्भात आज हायकोर्टात तातडीची सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत अनिल देशमुखांच्या जामिनावरची स्थगिती वाढवा, अशी मागणी सीबीआयकडून करण्यात आली होती. मात्र जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. त्यामुळे उद्याच अनिल देशमुखांची सुटका होणार आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. सीबीआयला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाकडून अनिल देशमुखांना जामीन मंजूर करण्यात आला होता. पण, सीबीआयच्या मागणीनंतर देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती (Stay on Bail Order) देण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयनं न्यायालयाला विनंती करत देशमुखांच्या जामीन अर्जाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. न्यायालयानं सीबीआयच्या विनंतीनंतर देशमुखांच्या जामिनाला स्थगिती दिली होती. त्यामुळे जामीन मिळूनही अनिल देशमुखांना तुरुंगातच राहावं लागलं होतं. अखेर आज हायकोर्टानं जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी फेटाळली आणि अनिल देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
Anil Deshmukh Bail : काही अटींसह अनिल देशमुखांना जामीन केलेला मंजूर
अनिल देशमुखांना (Anil Deshmukh News) 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्याता आला होता. त्यावेळी हायकोर्टानं काही अटी घातल्या होत्या. त्यानुसार, अनिल देशमुखांना त्यांचा पासपोर्ट तपास यंत्रणांकडे जमा करावा लागणार आहे. तपास यंत्रणा आणि कोर्टाच्या परवानगीशिवाय त्यांना देशाबाहेर जाता येणार नाही. तसेच, आठवड्यातून दोन दिवस त्यांना ईडी कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. याशिवाय तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना तपासात संपूर्णपणे सहकार्य करण्याचे निर्देश अनिल देशमुखांना जामीन मंजूर करताना मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते.
मुंबई सत्र न्यायालयाच्या सीबीआय कोर्टानं अनिल देशमुखांना जामीन नाकारला होता. त्यानंतर देशमुखांनी सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती मकरंद कर्णीक यांच्यासमोर या प्रकरणासंदर्भात सुनावणी पार पडली. काही दिवस या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. देशमुखांच्या जामीनावरील निकाल उच्च न्यायालयानं राखून ठेवला होता. आज न्यायालयानं या प्रकरणावरील निकाल देत अनिल देशमुखांना जामीन मंजूर केला आहे.
दरम्यान, अनिल देशमुखांना जामीन मंजूर झाला तेव्हा त्यांचं संपूर्ण कुटुंबीय न्यायालयात उपस्थित होतं. 1 नोव्हेंबर 2021 रोजी आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले होते, त्याचदिवशी ईडीकडून त्यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून अनिल देशमुख अटकेत होते. दरम्यानच्या काळात अनिल देशमुखांच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या निर्दशानंतर सीबीआयनं गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणीही देशमुखांना अटक झाली होती. एकाच वेळी दोन तपास यंत्रणांच्या दोन गुन्ह्यांमध्ये देशमुख अटकेत होते.