Jayant Patil : राणा दाम्पत्य काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आले, त्यांना कोणी गांभीर्याने घेऊ नये : जयंत पाटील
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर राणा दाम्पत्य निवडून आले आहे. त्यांना कोणी गांभीर्याने घेऊ नये असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
Jayant Patil : राणा दाम्पत्य कसे आहे ते अमरावतीकरांना, महाराष्ट्राला माहीत आहे. ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले आहेत. त्यांना कोणी गांभीर्याने घेऊ नये असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. निवडून आल्यानंतर त्यांनी लगेच बाजू बदलली आहे. त्याबद्दल मी काही बोलणार नसल्याचे पाटील म्हणाले. मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ल्याच्या संदर्भात देखील जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी पाटील म्हणाले की, कोणाच्याही गाडीवर असा हल्ला करणे योग्य नाही. तो हल्ला कोणी केला, याबाबत तपास करणे गरजेचे असल्याचे पाटील म्हणाले.
सिग्नलला गाडी उभी राहिल्यावर हल्ला करणे, त्यानंतर ती गाडी निघून जाणे हे सगळ जरा व्यवस्थित तपासले पाहिजे असे पाटील म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेची आज कोल्हापूरमध्ये संकल्प सभा होणार आहे. यासंदर्भात पाटील यांना विचारण्यात आले त्यावेळी पाटील म्हणाले की, पक्षात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आम्ही परिसंवाद यात्रा काढली होती.ही यात्रा 14 हजार किलोमीटरचा प्रवास करुन आज कोल्हापूरमध्ये पोहोचत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज कोल्हापूरमध्ये संकल्प सभा होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. अनेकांना पवार साहेबांवर बोलल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही. त्यामुळे ते बोलत असतात असा टोला पाटील यांनी विरोधकांना लगावला.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदुत्व आणि हनुमान चालिसा या मुद्द्यांवरुन हाय व्होलटेज ड्रामा सुरु असल्याचं दिसत आहे. अशातच आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'समोर आज अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हनुमान चालिसा पठण करणार आहेत. आज सकाळी नऊ वाजता दोघे पती-पत्नी मुंबईतील वांद्रे येथे असणाऱ्या मातोश्री समोर येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, रवी राणा यांच्या निवासस्थानासमोर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले आहेत. रवी राणा आणि नवनीत राणा यांना घराबाहेर येण्याचे आवाहन शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे. मात्र, अद्याप राणा दाम्पंत्य घराच्या बाहेर पडले नाही. पण त्यांनी आज मातोश्रीवर जाणारच असल्याचे सांगितले आहे.